सावंतवाडी
येथील मोती तलावाच्या तुटलेल्या “त्या” काठाची वीस दिवसात दुरुस्ती करण्याचा “अल्टिमेटम” दिल्यानंतर त्याआधीच या कामाला सुरुवात केली जाईल, त्यासाठी १ कोटी १२ लाखाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे, असे आश्वासन सार्वजनिक बांधकामच्या अभियंता अनामिका चव्हाण यांनी आज माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना दिले. दरम्यान आंबोली घाटातील रस्ता वारंवार खराब होत आहे. त्याचे कारण शोधून निकृष्ट काम करणाऱ्या संबंधित ठेकेदांरावर कारवाई करा, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. श्री. साळगावकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत सौ. चव्हाण यांची भेट घेतली.
यावेळी माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, उमेश कोरगावकर, उमाकांत वारंग, रवी जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. साळगावकर म्हणाले, सावंतवाडी शहराची अस्मिता असलेल्या मोती तलावाचा काठ कोसळून सहा महिने लोटले तरी संबंधित विभागाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. गाळ उपसा मोहिमेदरम्यान ही परिस्थिती उद्भवली. यासंदर्भात वारंवार मागणी करून सुद्धा कोणीही त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे वीस दिवसात कामाला सुरुवात करण्याचा इशारा आपण संबंधित अधिकाऱ्यांना दिला होता. याच पार्श्वभूमीवर आज आपण सौ. चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी लवकरात लवकर या कामाला सुरुवात होणार असून त्यासाठी एक कोटी बारा लाखाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे लवकरच “तो” कठडा सुस्थितीत केला जाईल, असे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले आहे.