सिंधुदुर्गनगरी याठिकाणी २० एकर जागेत २०० कोटी निधीतून टेक्नॉलॉजी सेंटरची भव्य वास्तू उभारण्यात येणार; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची माहिती
मालवण:
सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मालवण येथील निलरत्न निवासस्थानी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी व पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत देशात २० टेक्नॉलॉजी सेंटर मंजूर करण्यात आली असून यातील एक सेंटर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आले आहे. सिंधुदुर्गनगरी याठिकाणी प्रशस्त जागेत २०० कोटी निधीतून टेक्नॉलॉजी सेंटरची भव्य वास्तू उभारण्यात येणार आहे. आधुनिक यंत्रसामग्रीसह सुसज्ज अश्या या सेंटरच्या माध्यमातून उद्योग वाढीसह नवउद्योजक घडवले जातील, असा विश्वास केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मालवण येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, तालुका चिटणीस महेश मांजरेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, दीपक पाटकर, विजय केनवडेकर, माजी उपसभापती राजू परुळेकर, संतोष साटविलकर, संतोष गावकर, कृष्णानाथ तांडेल, सुहास हडकर, अविनाश सामंत, ललित चव्हाण, सौरभ ताम्हणकर, मंदार लुडबे आदी व इतर उपस्थित होते.
केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग खात्यामार्फत देशात यापूर्वी १८ टोक्नॉलॉजी सेंटर उभारली आहेत. आता देशात नवीन २० टेक्नॉलॉजी सेंटर मंजूर करण्यात आली असून यातील एक सेंटर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मंजूर केले आहे. २०० कोटींचे हे सेंटर ओरोस येथे २० एकर जागेत उभारण्यात येणार आहे. प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून लवकरच सेंटरचे भूमिपूजन केले जाईल. सेंटरची उभारणी एक ते दीड वर्षात पूर्ण होऊन त्यानंतर हे सेंटर सुरू होणार आहे, असे ही राणे यांनी सांगितले.
या सेंटर द्वारे जिल्ह्यात उद्योजक निर्माण केले जाणार आहेत. सेंटर मध्ये आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध असणार आहे. विविध प्रकारच्या उद्योगासाठी लागणारे साचे, साधने, यंत्रे या सेंटर मधून उद्योजकांना पुरविण्यात येणार आहेत. त्याद्वारे नवीन उद्योजकांना आपला उद्योग सुरू करणे सुलभ होणार आहे. तसेच स्थानिक उद्योजक, नवीन तरुण उद्योजक यांना उद्योग वाढीसाठी प्रशिक्षणही देण्यात येणार आहे, जिल्ह्यातील उद्योजकांना या सेंटरचा फायदा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीपथावर : केंद्रीय मंत्री नारायण राणे
शिक्षण, आरोग्य, समाजिक, क्षेत्रासह विकासाची व रोजगाराची दालने सिंधुदुर्गात उभी झाली. रस्ते, पुल, महामार्ग यासह अनेक विकास प्रकल्प सिंधुदुर्गात झाले. नव्याने अनेक प्रकल्प होत आहेत. येथील जनतेच्या साक्षीने हे सारे काही होत असताना विरोधकांनी केवळ विरोधाला विरोध व टिका करण्याचे काम केले. सिंधुदुर्गच्या विकासात विरोधकांचे योगदान शून्य आहे. आज जे कोणी आमदार, खासदार म्हणून येथून मिरवत आहेत. त्यांनी साधी बालवाडीही काढली नाही. त्यांच्यात धमकच नाही. आता सिंधुदुर्गात राजकारण करण्यासाठी अन्य ठिकाणाहून महिलांना बोलावण्याची वेळ विरोधकांवर आली आहे. अकार्यक्षम आमदार, खासदार यांना जनता ओळखून आहे. त्यामुळे येथील जनता यापुढे विरोधकांना थारा देणार नाही. जिल्ह्यातील खासदार आणि तिन्ही आमदार भाजपचेच असतील असा ठाम विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीपथावर आरुढ झाला असून सिंधुदुर्ग जिल्ह्याचाही कायापालट होईल, असेही मंत्री राणे यांनी स्पष्ट केले.