यंदा स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे. या निमित्ताने राज्यभरात “काजूवरील नवीन पालवीचे कीड रोगापासून संरक्षण” या विषयाबाबत प्रचार, प्रसिद्धी आणि जनजागृतीचा उपक्रम 30 नोव्हेंबर ,2022 रोजी दुपारी 3.00 वाजता वेबीनारच्या माध्यमातून आयोजित केला आहे. या मोहिमेअंतर्गत काजू उत्पादन वाढीच्या विविध विषयांवरही मार्गदर्शन केले जाणार आहे.
यासंदर्भात पुणे कृषि आयुक्तालयाद्वारे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कृषि विभागामार्फत “पिकेल ते विकेल” अभियानांतर्गत एक वेबीनार मालिका सुरू करण्यात आली आहे. “चर्चा करू शेतीची कास धरून प्रगतीची” हे या मालिकेचे नाव आहे. सप्ताहातील दर बुधवारी याबाबत चर्चासत्र आयोजित करण्यात येत आहे. या मालिकेच्या दि.30 नोव्हेंबर, 2022 रोजीच्या भाग- 90 मध्ये फलोत्पादन विभागाचे संचालक डॉ. कैलास मोते, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्लाचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. विजयकुमार देसाई यांचे काजू पालवी संरक्षणाबाबत मार्गदर्शन आयोजित केले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषि उपसंचालक (फलो- 3) खंडेराव सराफ करणार असून सूत्रसंचालन तंत्र अधिकारी (फलो-3) मनीषा भोसले करणार आहेत. हा कार्यक्रम कृषि विभागाच्या यूट्यूब चैनल च्या http:www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM/ या लिंकवरून जास्तीत जास्त लोकांना पाहता येणार आहे.
काजू हे कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग ,पालघर ,रायगड, कोल्हापुरात आजरा, चंदगड, गगनबावडा, भुदरगड, गडहिंग्लज या जिल्ह्यात तसेच नजीकच्या गोव्या राज्यातील महत्त्वाचे हमखास उत्पन्न व परकीय चलन मिळवून देणारे पीक आहे. बदलते हवामान, अनियमित पाऊस, दाट धुके, ढगाळ वातावरण यांच्या परिणामामुळे उशिरा येणारी नवीन पालवी, मोहर व फळधारणा तसेस तसेच कीड व रोगांचा उद्भवणारा प्रादुर्भाव यामुळे काजुच्या उत्पादनावर व गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो. काजू पिकावर वेगवेगळ्या जवळपास 180 किडी आढळतात. मात्र त्यापैकी ढेकण्या (टी मॉस्किटो), फुलकिडी ,खोड व मूळ पोखरणारा भुंगा (रोठा), फळ व बी पोखरणारी अळी, पाणी पोखरणारी अळी या किडींचा तसेच करपा, शेंडेमर/ पिंकरोग व डिंकया रोग / फांदीमर इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे .पर्यायाने काजू पिकाच्या नवीन येणाऱ्या पालवीचे कीड व रोगांपासून संरक्षण करून उत्पादन वाढ कशी करावी याची विस्तृत चर्चा या वेबीनारमध्ये होणार आहे. तरी राज्यातील सर्व कृषि अधिकारीवर्ग व शेतकरीवर्गाने सहभागी व्हावे.