कणकवली :
उद्या दि. २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२२ या कालावधीत कणकवली तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सर्व प्रक्रिया तहसिलदार कार्यालयात होणार असून तेथे ३८ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसहीत कर्मचान्यांचा ताफा तैनात असणार आहे. यासाठी माहिती फलकासहीत पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतनिहाय बैठक व्यवस्था करण्यात येत आहे. तहसिलदार आर. जे. पवार हे स्वतः उपस्थित राहून या साऱ्यावर बारकाईने लक्ष ठेवत आहेत.
तालुक्यातील ६३ पैकी ५८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका १८ डिसेंबर रोजी होणार आहेत. यासाठी सोमवार २८ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची कार्यवाही होणार आहे. ही सर्व प्रक्रिया तहसिलदार कार्यालयात होणार आहे. यासाठी ३८ निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यकांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकेका निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडे छोट्या दोन व मोठ्या एकच ग्रामपंचायती देत नियोजन करण्यात आले आहे. तसेच त्यांना सहाय्यकही देण्यात आले आहेत. तसेच हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी होणाऱ्या गर्दीचा विचार करता पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये कंपार्टमेंट तयार करत बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणाऱ्या उमेदवार व कार्यकर्त्यांच्या माहितीसाठी कोणत्या नंबरच्या कंपार्टमेंटमध्ये कोणती ग्रामपंचायत आहे, याबाबतचे माहितीफलक गेटवर तसेच तहसीलदार कार्यालयात लावण्यात आलेले आहेत. जेणेकरून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणाऱ्यांना कोणतीही समस्या जाणवू नये याची दक्षता घेण्यात येत आहे. तसेच दाखल अर्ज फिडींग करण्यासाठी तहसीलदार कार्यालयात संगणक कक्षही सज्ज करण्यात आला आहे. तहसीलदार आर. जे. पवार, निवासी नायब तहसिलदार शिवाजी राठोड व सर्व टीम यासाठी कार्यरत आहेत.
दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी येताना गर्दी करू नये. तसेच अर्ज दाखलसाठी येताना उमेदवार व सोबत चारच जणांना कंपार्टमेंटमध्ये प्रवेश असणार आहे. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही श्री.आर.जे. पवार यांनी केले आहे.