विद्यार्थ्यांसोबतच पालकांच्या स्पर्धांमुळे वाढली रंगत….
सावंतवाडी
येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. याप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने क्रांतीरत्न पुरस्कार विजेते अशोक दाभोलकर उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून स्पर्धांची सुरुवात करण्यात आली.
सुरुवातीला चालू शैक्षणिक वर्षी विविध खेळांमध्ये उत्तम कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या क्रीडांगणावर क्रीडाज्योत फिरवली. शाळेच्या प्राथमिक तसेच माध्यमिक या दोन्ही विभागातील विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेतला.
यापैकी इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी डंबेल्स, लेझीम, रिंग व रिबन अशा विविध ड्रिल्सचे सादरीकरण केले. इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध रित्या परेड सादर केली. यावेळी हर्डल रेस, रनिंग रेस ,रिले, रस्सीखेच अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. पालकांसाठी आयोजित केलेल्या खेळांमध्ये पालकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
प्रमुख पाहुणे अशोक दाभोलकर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना संस्थेला व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, अध्यक्षा अस्मिता सावंतभोसले, सचिव संजीव देसाई , सदस्या सानिका देसाई , प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, पॉलिटेक्निक प्राचार्य गजानन भोसले, बी फार्मसी प्राचार्य डॉ.विजय जगताप, डी फार्मसी प्राचार्य सत्यजित साठे तसेच सर्व पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते._
_कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका डिसोजा व सोनाली शेट्टी यांनी तर आभार प्रदर्शन निधी सावंत यांनी केले.