पोस्ट ऑफिस आणि तळेरे हायस्कूलचा संयुक्तिक उपक्रम
तळेरे हायस्कूल मध्ये ‘ढाई आखर राष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धा’संपन्न
तळेरे
वामनराव महाडीक विद्यालय व कनिष्ठ कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,तळेरे येथील डॉ.एम.डी.देसाई या सांस्कृतिक भवनात राष्ट्रीय पत्र लेखन स्पर्धा नुकतीच पार पडली.यावेळी वामनराव महाडीक विद्यालय व पोस्ट ऑफिस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ढाई आखर राष्ट्रीय पत्र लेखन स्पर्धेंतर्गत ‘निबंध स्पर्धा’ विद्यालयात राबविण्यात आली. विद्यालयातील जवळपास 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी आपला सहभाग नोंदवला.”सन 2047 मधील भारत” हा विषय निबंध स्पर्धेसाठी घेऊन आंतर्देशीय पत्रावर त्याचे लेखन करण्यात आले.
आजच्या काळातील मुलांना पत्रलेखन माहीत व्हावे तसेच पत्र प्रकार माहित व्हावेत यासाठी निबंध आंतर्देशीय पत्रामधून लिहून घेण्यात आला. यावेळी प्राचार्य अविनाश मांजरेकर,तळेरे पोस्ट सेवा विभागाचे व देवगड उपविभागाचे डाक निरीक्षक मनोजसिंह पनवर,डाक सहाय्यक महेश केसरकर,पोस्ट ऑफिस कर्मचारी अंकित घाडी, शिक्षकवृंद आदी उपस्थित होते. प्राध्यापिका एस.एन. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा विद्यालयात राबविण्यात आली.