वीज वितरण मेळाव्यात नागरिकांनी मांडल्या समस्या
देवगड
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित सिंधुदुर्ग आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ, देवगड तालुका व्यापारी संघटना, ग्राहक पंचायत देवगड, यांच्या सहकार्याने वीज ग्राहक मेळाव्याचे आयोजन गुरुवार दिनांक २४ नोव्हेंबर रोजी श्रीकृष्ण मंगल कार्यालय जामसंडे या ठिकाणी करण्यात आले होते. या मेळाव्याचे उदघाटन दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत देवगड तालुका व्यापारी संघ,देवगड वीज वितरण कंपनी,यांनी केले.
याप्रसंगी अधीक्षक अभियंता विनोद पाटील, कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते, उपविभागीय अधिकारी नशीम शेख, देवगड शाखा अभियंता वैभव कानडे तसेच अन्य सर्व शाखा अभियंता महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी, जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके, मधुकर नलावडे, देवगड तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष शैलेश कदम ,दत्तात्रय वातकर, संजय मेस्त्री व अन्य पदाधिकारी सदस्य उपस्थित होते .या वीज ग्राहक मेळाव्याच्या निमित्ताने वारंवार कट्टा परिसरात खंडित होणारा वीस पुरवठा अपुरे दाबाने होणारा वीज पुरवठा त्यामुळे वीज उपकरणांची होणारी हानी ,याकरिता या भागात सिंगल फेज लाईन एवजी थ्री फेज लाईन ची मागणी, तसेच देवगड पंचशील नगर येथील जीर्ण झालेले विद्युत पोल बदलणे, याबाबत वारंवार मागणी करूनही कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे वीज ग्राहक विजय कदम यांनी मांडले .याबरोबरच विजवाहक तारा आंबा काजू बागायती मधून गेल्या असून शॉर्ट सर्किटने ठिकठिकाणीच्या भागांमध्ये आंबा बागायती व काजू बागायती मध्ये ठिणगी पडून आग लागणे व त्यापासून बागायतीचे नुकसान होते याबाबत कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळत नसल्याबाबत खंत दयाळ गावकर यांनी व्यक्त केली.तसेच सरासरी विद्युत आकार,भरमसाठ विद्युत बिल आकारणी, त्याचप्रमाणे वीज बिल वेळेवर न येणे, वीज जोडण्याची मागणी वेळेवर करून देखील त्या वेळेवर न होणे, नवीन मीटर उपलब्ध न होणे, स्ट्रीट लाईट करता आवश्यक ते सहकार्य न करणे, वारंवार कोणतीही पूर्व सूचना न देता विद्युत पुरवठा खंडित करण्याची नोटीस अथवा धमकी देणे.या बाबत नागरिकांनी तक्रारी मांडल्या. त्याचबरोबर चिरेखाण व्यवसायिकांच्या वतीने कमी दाबाचा पुरवठा चिरेखाण व्यवसायिकाना होत असल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होते. भरमसाठ लाईट बिल आकारणी स्ट्रीट लाईट संबंधी सडलेल्या आणि लोंबत असलेल्या असुरक्षित विद्युत वाहक तारा, याबाबत उपस्थित वीज ग्राहकांनी तक्रारी व सूचना मांडल्या.तसेच काही तक्रारी लेखी स्वरुपातही या मेळाव्यात संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आल्या. या निमित्ताने अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी या सर्व तक्रांचे योग्य ते निराकरण लवकरात लवकर करण्यात येऊन वीज ग्राहकाला न्याय देण्यात येईल असे सूचित केले. या चर्चेत आनंद देवगडकर, वैभव बिडये, दयाळ गावकर,ओंकार खाजणवाडकर ,नंदू देसाई ,अनिल कोरगावकर ,शिरगाव सरपंच श्री .शिरगावकर ,अनिल रानडे माणिक दळवी,व अन्य वीज ग्राहकांनी सहभाग घेतला.