You are currently viewing सावंतवाडी पालिकेच्या निर्णयानुसार मोकाट गुरांसाठी जुनाबाजारात कोंडवाडयाची व्यवस्था

सावंतवाडी पालिकेच्या निर्णयानुसार मोकाट गुरांसाठी जुनाबाजारात कोंडवाडयाची व्यवस्था

सावंतवाडी

येथील पालिकेकडून शहरात फिरणाऱ्या मोकाट गुरांसाठी जुनाबाजार परिसरात कोंडवाड्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या ठिकाणी पकडण्यात येणाऱ्या गुरांना खाद्य देण्याबरोबर त्यांचे संगोपन करण्यात येणार आहे. यासाठी माजी नगरसेवक सुरेश भोगटे व उमेश कोरगावकर यांनी पाठपुरावा केला होता. आज त्यांनी या कोंडवाड्याची पाहणी केली. तसेच शहरात असलेला जुना कोंडवाडा पुन्हा सुरू करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.

यावेळी आरोग्य अधिकारी पांडुरंग नाटेकर, सामाजिक कार्यकर्ते उमाकांत वारंग, अमोल सारंग, शिवसेना शहरप्रमुख शैलेश गौडळकर आदींनी गुरांचा बंदोबस्त करणारे महंमद करोल यांच्याशी चर्चा केली.सावंतवाडी शहरात दिवसेंदिवस मोकाट गुरांचा वावर वाढत असल्यामुळे नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मोती तलावा काठी मोकाट गुरांचा वावर जास्त असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असते. त्यामुळे अशा गुरांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी गेले अनेक दिवस सर्वपक्षीयांसह ज्येष्ठ नागरिकांकडून होत होती. याच पार्श्वभूमीवर श्री. भोगटे व श्री. कोरगावकर यांच्याकडून पाठपुरावा सुरू असतानाच जुना बाजार येथे कोंडवाड्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या ठिकाणी अशा जनावरांचे पालन संगोपन केले जाणार आहे. याबाबत पालिका प्रशासनाने सुद्धा सकारात्मक भूमिका बजावली आहे. त्यामुळे शहरातील मोकाट गुरांचा प्रश्न नक्कीच मार्गी लागेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा