पुणे :
रविवार दिनांक २० नोव्हेंबर २०२२ रोजी मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी (रजि. ट्रस्ट) संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळा पुणे शहरातील सांस्कृतिक सभागृहात थाटात संपन्न झाला. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील २५ क्षेत्रांतून पुरस्कारासाठी निवडलेल्या १११ मानकऱ्यांना या सोहळ्यात मानाचा फेटा, मानकरी बॅच, महावस्त्र, गौरवपदक, सन्मानचिन्ह आणि मानपत्र या स्वरूपात राज्यस्तरीय पुरस्कार थाटात प्रदान करण्यात आले. सुप्रसिध्द कीर्तनकार ह. भ. प. श्री. शामसुंदर महाराज सोन्नर हे या समारंभाचे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही घटनाकारांनी दिलेली संविधानमूल्ये गुणिजनांनी प्राणपणाने जपावीत, असे आवाहन त्यांनी आपल्या बीजभाषणात केले. सुप्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ सौ. मोनिका गोडबोले-यशोद या सोहळ्याला विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. विशेष शिक्षणातील त्यांच्या अनुभवसिद्ध भाषणाने त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. समारंभाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध प्रेरक वक्त्या सौ. मनिषा कदम यांनी केले. गुणिजन परिवाराचे पदाधिकारी श्री. प्रकाश सावंत, श्री. लक्ष्मणराव दाते, श्री. अमोलराव सुपेकर यावेळी उपस्थित होते. यावेळी झालेल्या विविध गीतांच्या सादरीकरणात मानकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. सोहळ्याच्या समारोपात तमाम महिला वर्गाने राष्ट्रवंदना सादर करून समारंभाची सांगता केली. वर्ष १९९९ मध्ये स्थापन झालेल्या मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या गुणिजन संस्थेचा हा २२ व्या वर्षातील पुरस्कार सोहळा होता. “पुरस्कार प्रेरणा देतात; प्रेरणेने राष्ट्र मोठे होते!” या ब्रीदवाक्यावर कार्यरत ही संस्था राज्यस्तरीय, राष्ट्रस्तरीय आणि विदेशस्तरीय पुरस्कार उपक्रम आयोजित करीत असते. या संस्थेकडून सौ.वसुधा वैभव नाईक,पुणे, यांना “राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार २०२२ ” या पुरस्काराने गौरवण्यात आले.
*वसुधा नाईक, पुणे*