कणकवली
स्वामीराज प्रकाशन ही संस्था दर महिन्याच्या २७ तारखेला ‘ मराठी आठव दिवस ‘ हा उपक्रम साजरा करते. या उपक्रमांतर्गत रविवार २७ नोव्हेंबर रोजी कणकवली येथे ज्येष्ठ साहित्यिक अशोक नायगावकर आणि महेश केळुसकर यांचा ” मस्करिका ” हा काव्य – संवादाचा कार्यक्रम सादर होणार आहे.
मराठी आठव दिवस हा मराठी भाषा प्रचार, प्रसार आणि संवर्धनाचा उपक्रम असून आतापर्यंत कोल्हापूर, कणकवली, गोवा, पुणे, मुंबई, नाशिक, शिर्डी, ठाणे, नालासोपारा, कल्याण येथे विविध कार्यक्रम सादर झाले आहेत. या उपक्रमास अभिनेते प्रशांत दामले, दिग्दर्शक संतोष पवार, राजेश देशपांडे, पोलीस उपायुक्त रुपाली अंबुरें, गायक अतुल बेले, मेघा विश्वास यांच्यासह अनेक मान्यवर जोडले गेले आहेत.
संस्थेने ‘ मराठी दिवाळी ‘ सुद्धा साजरी केली. विशेष म्हणजे यावेळी स्वेच्छा निधी गोळा करण्यात आला आणि हा निधी आता नगर जिल्ह्यातील ओला दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना वितरित केला जाणार आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाने २५ हजारांची देणगी जाहीर केली आहे.
कणकवलीत एप्रिल मध्ये ‘ मराठी आठव दिवस ‘ साजरा झाला होता. कणकवलीकरानी पुन्हा एकदा आग्रहाचे निमंत्रण दिल्याने २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता अशोक नायगावकर आणि महेश केळुसकर या दोन ज्येष्ठ साहित्यिकांचा ‘ मस्करिका ‘ हा कार्यक्रम सादर होणार आहे.
जानवली येथील माती नेचर रिसॉर्ट येथे हा कार्यक्रम होणार असून तो सर्वांसाठी विनामूल्य आहे. तरी कणकवलीतील सर्व साहित्य रसिकांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक प्रसाद सावंत आणि स्वामीराज प्रकाशनच्या संचालिका रजनी राणे यांनी केले आहे.