You are currently viewing दडलेला मराठ्यांचा इतिहास

दडलेला मराठ्यांचा इतिहास

ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचा लेख –

 

 

अल्लाउद्दीन खिलजी यांने यादव साम्राज्य नेस्तनाबूत केले. त्यानंतर तीनशे वर्ष गुलामगिरीची, हालअपेष्टाची, क्रूर राजकर्त्यांची आणि असंवेदनशील सरकारची गेली. भारताची जनता यात भरडली गेली. शहाजी महाराजांच्या रूपाने एक सक्षम योद्धा निर्माण झाला. ज्याने स्वातंत्र्यासाठी ज्योत पेटवली. जिजामातेने सुरुवातीपासून स्वातंत्र्याची कास धरली. स्वतः प्रशिक्षित झाली आणि मग आपल्या मुलाच्या मनामध्ये स्वातंत्र्याची, क्रांतीची प्रेरणा निर्माण केली. छत्रपती शिवरायांनी या महाराष्ट्रात स्वराज्य स्थापन केले, जे पुढे जाऊन दिल्लीच्या तक्तावर सुद्धा हुकुमत गाजवू लागले.

या सर्व प्रक्रियेमध्ये जनता जनार्दनाने साथ दिली व प्रत्येक माणसाने त्याग करून हे राष्ट्र उभे केले. त्यात विशेषकरून, शिवराय गेल्यानंतर महाराष्ट्रावर औरंगजेबच्या रूपाने भयानक अवकळा आली. तत्कालीन सर्वश्रेष्ठ मोघली साम्राज्याचा शहेनशहा मराठा राज्य गिळंकृत करण्यासाठी महाराष्ट्रात उतरला. संभाजी महाराजांनी नऊ वर्ष अनेक शत्रूशी झुंज दिली. त्यांना क्रूर औरंगजेबाने छळ करून मारले. पण महाराज नमले नाहीत. आपल्या राष्ट्रासाठी आपल्या जनतेसाठी त्यांनी मृत्यूला कवटाळले. “सर कटेंगे, लेकिन सर झुकेंगे नही”. हे त्यांनी प्रत्यक्षात उतरवले. त्यानंतर अकरा वर्ष राजाराम महाराजांनी हे राष्ट्र राखले. संभाजी महाराज गेल्यानंतर महाराणी येसूबाईनी हे राष्ट्र राखण्याचे काम केले. आपला पुत्र शाहू महाराजाला छत्रपती न करता त्यांनी राजाराम महाराजांना छत्रपती केले व मराठ्यांचा गौरवशाली इतिहासामध्ये एक सुवर्ण अक्षराने लिहिलेले पान निर्माण केले. स्वराज्य वाचवण्यासाठी राजाराम महाराजांना जिंजीला जावं लागलं.

छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी बघा की आग्र्याहून सुटका झाल्यानंतर महाराष्ट्रात परत आल्यावर त्यांनी औरंगजेबशी लढा देण्याची तयारी सुरू केली. म्हणून दक्षिण दिग्विजय ही मोहीम हातात घेतली. बेंगलोर होऊन वेल्लोर, जिंजी हे दक्षिणेतील राज्य निर्माण केले. त्यांनी औरंगजेबसाठी सापळा रचला. म्हणूनच राजाराम महाराजांना जिंजी जाऊन स्वराज्य जिवंत ठेवता आले. महाराष्ट्रापासून जिंजीपर्यंत अनेक ठिकाणी ठाणी निर्माण करण्यात आली. हा १०० किलोमीटरच्या प्रदेशात एक विशाल असे रणांगण निर्माण झाले. औरंगजेबची लाखोची फौज महाराष्ट्रात उतरली. राजाराम महाराज जिंजीला गेल्यामुळे या सैन्याचे विभाजन झाले. अर्धे सैन्य दक्षिणेकडे गेले. त्याचबरोबर संताजी, धनाजीने पूर्ण विभागात धुमाकूळ गाजवला. म्हणून औरंगजेबच्या सैन्याचे तुकडे तुकडे झाले व सर्व मराठ्यांच्या सैन्याचे पाठीमागे वेगवेगळ्या तुकड्या औरंगजेबच्या निघाल्या. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचे वेगवेगळे स्वरूप निर्माण झाले. मराठ्यांनी गनिमीकाव्याचा खरा वापर या पद्धतीने केला. किल्ल्यामध्ये थोडी लढाऊ शिबंदी ठेवून मुख्य सैन्य वेगवेगळ्या सेनापतीच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या दिशेने पाठवण्यात आले. कृष्णा सावंत यांनी वराड खानदेश मध्ये स्वारी केली आणि ताराराणीच्या काळात नर्मदा पार करून मोघली सैन्यावर तुटून पडले. अशाप्रकारे संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि ताराराणीने २७ वर्ष मराठे औरंगजेबाबरोबर लढले आणि मराठ्यांच्या सैन्याची व्याप्ती वाढवून दिल्लीवर नजर ठेवून मराठ्यांनी हे स्वतंत्र युद्ध अत्यंत शिताफीने लढवले. शेवटी १७०७ साली औरंगजेबाला या मातीतच देह सोडावा लागला.

जगातील सर्वश्रेष्ठ सम्राट ज्याने प्रचंड सैन्यानिशी अफगाणिस्तान पासून दक्षिणेपर्यंत प्रांत कब्जा केला, त्याला मराठ्यांनी आपल्या युद्ध कौशल्याने आणि धाडसाने, त्यागाने शिकस्त केले. जगातील युद्धशास्त्रामध्ये हे एक सर्व श्रेष्ठ उदाहरण आहे की जेथे छोट्या सैन्याने मोठ्या सैन्याचा पराभव करून एक स्वराज्य निर्माण केले. आणि ते वाचवण्यासाठी स्वतंत्र लढा देऊन टिकवले. पुढे जाऊन दिल्लीच्या तक्तावर सुद्धा आपला प्रभाव टाकून अटकेपार झेंडा लावला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्ध शास्त्राची आपल्याला कल्पनाच नाही. वास्तविकरित्या जगामध्ये गनिमी काव्याच्या युद्धाला एका गतिमान युद्धामध्ये परिवर्तित करून, किल्ल्यावर अवलंबून राहणाऱ्या सैन्याला गतिमान युद्धामध्ये परवर्तित करून एका प्रचंड मोठ्या सम्राटाला नामशेष केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेवटच्या दिवसांमध्ये ह्या प्रकारचे नियोजन करण्यात आले व छत्रपतींनी आपल्या पुत्रांना अशा प्रकारच्या युद्धामध्ये निष्णात केले. संभाजी महाराजांनी राजाराम महाराजांना या युद्धात तरबेज केले. ज्यावेळी राजाराम महाराज जिंजीला गेले. त्याने महाराष्ट्रामध्ये ताराराणीच्या नेतृत्वाखाली एक राज्यमंडळ बनवले व महाराष्ट्राला सुरक्षित करण्यासाठी येथे रामचंद्रपंत अमात्य, संताजी, धनाजी आणि अनेक सरदार यांनी आपल्या प्राणाची बाजी लावून मराठ्यांचे २७ वर्षाचे स्वातंत्र्य युद्ध यशस्वीपणे लढले.

संभाजी महाराज यांची हत्या झाल्यानंतर हे मराठ्यांचं साम्राज्य नष्ट करायला काय वेळ लागणार नाही असे औरंगजेबला वाटले आणि म्हणून ज्या वेळेला राजाराम महाराज जिंजीकडे जायला निघाले, त्यांचा त्यांनी पाठलाग केला. वाटेत चन्नम्मा राणी यांनी मराठ्यांना साथ दिली. राजारामाला संरक्षण दिले. हे कळल्यावर औरंगजेब आणि मोठी फौज चन्नम्माविरुद्ध पाठवली. पण संताजीने पाठीमागून येऊन या सैन्यावर हल्ला करून त्यांना नामशेष केले. मराठ्यांच्या राजाचा संरक्षण करणाऱ्या चन्नम्माला अभय दिले आणि त्याच्यावर कुठलाही हल्ला होऊ दिला नाही.

जिंजीवरून परत आल्यावर राजाराम महाराजांनी सैन्य घेऊन औरंगजेबच्या सैन्यावर जागोजागी हल्ले केले. त्यात त्यांची प्रकृती ढासळली व औरंगजेब साताऱ्यावर हल्ला करत असताना. सिंहगडावर त्यांचा मृत्यू झाला. ताराराणी या पंचवीस वर्षाच्या विधवा स्त्रीवर फारच मोठे संकट आले. मराठ्यांचा राजाच गेल्यावर रयत सुद्धा हतबल झाली. आता स्वराज्याचे काय होणार? पण ताराराणीने कंबर कसली आणि स्वराज्याचे संरक्षण करण्यासाठी स्वतः एका हातात तलवार घेऊन व दुसऱ्या हातात मुसद्दीपनाचा मोठा आदर्श पाडून त्यांनी स्वराज्य सांभाळले. त्यांनी आक्रमकपणे हल्ले सुरू केले. औरंगजेबचा इतिहासकार काफीखान म्हणतो की ताराबाईने सगळा कारभार आपल्या हाती घेतला. सरदारांच्या नेमणुका केल्या. त्यांच्या हाताखाली सैन्य निर्माण केले. बादशाहच्या मुलखावर हल्ले केले. त्यांनी आपल्या सरदारांची मन जिंकली.

ताराराणीने अत्यंत करारीपणे धाडसाने राज्य केले. इटालियन प्रवासी मनूची म्हणतो औरंगजेब बादशहा मराठ्यांचे किल्ले घेण्यास गुंतून पडला असता, ताराबाईच्या फौजा माळाव्यातून दिल्लीच्या दिशेने व तेलंगनापासून ढाक्क्याच्या दिशेने धावत होत्या; मराठे आपले साम्राज्य उद्ध्वस्त करत असल्याचे चित्र बादशहाच्या आयुष्याच्या अखेरीस पहावे लागले. याचे पूर्ण श्रेय ताराबाईंना जाते. औरंगजेबाच्या लष्करी सामर्थ्याची तुलना मराठ्यांच्या सैन्याशी होऊ शकत नाही. पण महाराणी ताराराणीने त्यांना पराभूत केले. अशा राणीचे नाव जगप्रसिद्ध झाले पाहिजे होते. पण महाराष्ट्रातील इतिहासाच्या पुस्तकातून ते मिटवून टाकण्यात आले आहे. कुणाला ताराराणीचा इतिहास माहीत नाही. हा ताराराणीवरच नाही, तर पूर्ण स्त्री जातीवर घोर अन्याय आहे. पेशवेकालीन इतिहासकारांनी ताराराणीला पूर्ण बदनाम केले. आणि या जगातील सर्वश्रेष्ठ महिला यौद्ध्यावर प्रचंड अन्याय केला. म्हणून महाराणी ताराराणीला संभाजी, राजाराम महाराजांबरोबर महाराष्ट्रातील K.G ते P.G. मध्ये अग्रगण्य स्थान दिले पाहिजे. आज खोट्या इतिहासाला गाडून खरा इतिहास लिहिण्याची गरज आहे. संताजी, धनाजी, नेमाजी, कुसमाजी अशा अनेक लढवय्याची नावे इतिहासाच्या काळा आढ लुप्त झाली आहेत. ती पुन्हा लोकांसमोर आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया, ही विनंती .

 

लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

मोबा. नं. ९९८७७१४९२९

प्रतिक्रिया व्यक्त करा