बांदा
निर्मिती पीपल्स अँड ऍनिमल वेलफेअर असोसिएशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने तसेच बांदा ग्रामपंचायत व प्राणीमित्र पोलीस कर्मचारी ज्योती हरमलकर यांच्या सहकार्याने आज बांदा शहरातील २५ भटक्या कुत्र्यांचे निर्बीजिकरण (नसबंदी) व अँटी रेबीज लसीकरण करण्यात आले.
सेवाभावी सा संस्थेचे व्यवस्थापक, दोन जनावरांचे वैद्यकीय अधिकारी आणि ८ कर्मचारी यांच्या पथकाने भटक्या कुत्र्यांना जाळ्यात पकडून ही मोहीम फत्ते केली. बांदा शहरात बेवारस कुत्र्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ़ झाली आहे. भटक्या कुत्र्यांचा शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याने या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी वेळोवेळी होत होती.
बांदा शहरातील कुत्र्यांची नसबंदी करण्याची मोहीम ८ दिवस राबविण्यात येणार आहे. आज सकाळी या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. आज या संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी पोलीस कर्मचारी ज्योती हरमलकर यांच्या सौजन्याने बांदा मच्छीमार्केट परिसरातील २५ भटक्या कुत्र्यांना जाळीच्या साहाय्याने पकडून त्यांचे नसबंदीचे ऑपरेशन केले. ऑपरेशन केल्यानंतर या सर्व कुत्र्यांना तीन दिवस जेवण देऊन नंतरच त्यांना सोडण्यात येणार आहे. यामुळे भविष्यात शहरातील बेवारस कुत्र्यांची वाढ थांबणार आहे. शहरातील प्रत्येक गल्लीत, वाडीवर भटके कुत्रे असतील तर त्यांना बांधून ठेऊन याची माहिती ज्योती हरमलकर यांना द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. या मोहिमेसाठी बांदा ग्रामपंचायतने जागा उपलब्ध करून दिली. एका कुत्र्याचा नसबंदीचा खर्च हा १ हजार ८६० रुपये आहे.