सावंतवाडी
आरोंदा ते सावंतवाडी रेल्वे स्थानकापर्यंत प्रवासाकरीता झालेल्या ५ लाखांच्या ऑनलाईन फसवणूकीत सायबर पोलीसांच्या प्रयत्नांमुळे ऑनलाईन कार बुकींग करताना पर्यटकाच्या खात्यातुन गेलेल्या रक्कमेपैकी पावणेदोन लाख रुपये अवघ्या तासाभरात सायबर विभागाने परत आणले आहेत.सिंधुदुर्ग सायबर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. त्यामुळे ऑनलाईन फसवणूकीत सायबर पोलीसांना वेळीच संपर्क साधला असल्यामुळेच हे शक्य झाले आहे.
आरोंदा ते सावंतवाडी रेल्वे स्थानक प्रवासा करिता शुक्रवारी दि.१८ नोव्हेंबर रोजी ऑनलाईन कार बुकींग करताना ५ लाखांची फसवणूक झाली होती.सदर घटनेबाबत तक्रारदार सावंतवाडी पोलीस ठाणे येथे आले असता पोलीस निरिक्षक श्री. फुलचंद्र मेंगडे यांनी तक्रारदार यांच्या फसवणूकीच्या व्यवहाराची सर्व माहिती घेवून ती माहिती सिंधुदुर्ग सायबर विभागाला फोनव्दारे तात्काळ पुरविली असता सायबर पोलिसांनी झालेल्या सर्व फ्रॉड व्यवहारांचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपीचा भिलाई छत्तीसगड येथील ठावठिकाणा काढत आरोपीने क्रेड ॲप व्दारे केलेले सर्व फ्रॉड व्यवहार तात्काळ ब्लॉक केले व तक्रारदाराला एकूण रक्कमेपैकी १ लाख ७१ रुपये एक तासांचे आत परत मिळवून दिले, तसेच उर्वरित ३ लाख रुपये संबंधित बँकेमध्ये होल्ड करण्याची कार्यवाही सायबर विभागाकडून करण्यात आलेली आहे, असे पोलिसांनी सांगितले.
या गुन्ह्याचा तांत्रिक तपास जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे अधिकारी सपोनि बळीराम सुतार, सपोनि महेंद्र घाग ,पोकॉ स्वप्निल तोरस्कर , मपोकॉ धनश्री परब, मपोकॉ स्नेहा चरापले तसेच सावंतवाडी पोलीस ठाणे निरिक्षक फुलचंद मेंगडे व पोउनि सुरज पाटील यांनी केला.
आपला ओटीपी,एटीएम कार्ड/पीन, सीव्हीव्ही कोणासही शेअर करू नये, तसेच सायबर फ्रॉडला बळी पडल्यास https://cybercrime.gov.in/ किंवा 1930 वर तात्काळ तक्रार करावी असे आवाहन सिंधुदुर्ग पोलीसांतर्फे करण्यात आले आहे.
ऑनलाइन कार बुकिंग करण्याचा प्रयत्न करणा-या मुंबई येथील अपघातग्रस्त रूग्णाला अज्ञाताने तब्बल ५ लाख ६ हजार ३२२ रुपयाला ऑनलाइन गंडा घातला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने सावंतवाडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी धाव घेतली. संबंधित कार रेंटल साईटच्या विरोधात तक्रार दिली आहे.ते मूळचे मुंबई येथील आहेत. ते आरोंदा येथे पाहुण्यांकडे आले होते. तिथे त्यांचा अपघात झाला होता त्यात ते जायबंदी झाले होते. त्यामुळे रेल्वे स्टेशन वर जाण्यासाठी त्यांनी महादेव कार या साईटवर जाऊन गाडी भाड्याने घेण्यासाठी आवश्यक असलेली माहिती नोंदवली. यावेळी त्यांच्याकडून एटीएमच्या नंबरची मागणी करण्यात आली. त्यानुसार त्यांनी आपले एटीएम नंबर त्या साइटवर घातले. त्यानंतर १०० रुपयाची मागणी करण्यात आली ते देण्यासाठी त्यांनी पुढची प्रक्रिया करत असताना अचानक त्यांची ऑनलाइन प्रक्रिया थांबली व त्यांच्या एका बँकेत असलेल्या अकाउंट मधील दोन लाख १ हजार ५६४ तर दुसऱ्या बँकेत असलेल्या अकाउंट मधील तीन लाख ४ हजार ७५८ रुपये अज्ञातांकडून काढून घेण्यात आले आहेत. काही वेळाने त्यांना आपल्या खात्यातील रक्कम डेबिट झाल्याचा मेसेज आला. त्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी या विरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपला तक्रार अर्ज दाखल केला होता.