*वक्रतुंड साहित्य समूहाचे सदस्य लेखक ऍड.सर्जेराव साळवे यांनी “ऊसकोंडी” या – कृषीकेंद्रित, सकारात्मक संदेश देणाऱ्या कादंबरीचे केलेलं उत्कृष्ट समीक्षण*
डॉ. श्रीकांत पाटील यांनी ऊसकोंडी या कादंबरीत ग्रामीण भागातील व एका कष्टकरी शेतक-याच्या कुटुंबाचे अतिशय सुंदर व बोलके चिञ रेखाटले आहे. एक युवा शेतकरी मनुदा आपली अर्धांगिनी शितल हिच्या मदतीने व अनुभवी शेतीनिष्ट शेतकरी वयोवृद्ध परंतू अजूनही मनान तरूण असणारे आबा यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीमध्ये राबराब राबून, शेतीमातीशी ईमान राखून आपला संसारगाडा हाकारीत आहे. नायक वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेली दमकोंडी, ऊसकोंडी याला जराही न डगमगता व मागे न हटता एखाद्या युद्धात सारे सैन्य धारातीर्थी पडले असता, हतबल न होता एखाद्या विजयी वीराप्रमाणे पुढील दुश्मन सैन्यावर – संकटांवर तुटून पडावे तसा तुटून पडण्यासाठी सज्ज आहे.
कादंबरीतील नायक कर्जबाजारी होऊन शेतीची मशागत व ऊसाची लागवड करतो. परंतू अवकाळी पाऊस सारे होत्याचे नव्हते करून टाकतो. मनूदाची कंबर मोडते , परंतू शितल आणि आबा यांच्या मदतीने तो पुन्हा कंबर कसून दुबार ऊस रोपाची लागवड करून निसर्गाशी लढत रहातो. या कठीण समयी त्याच्या प्रामाणिकपणावर व वेळी अवेळी मदतीसाठी धावणारा मनुदा म्हणून त्याचे नेहमीचे शेतमजूर मिञ भिम्या, नाम्या, पंड्या, जयश्या व महिला मजूर त्याच्या मदतीला धावून जातात. मनूदाची केवळ निसर्गच कोंडी करतो असे नाही तर कारखाना, ऊसतोड मुकरदम, पायलट ऑफिसमध्ये नोंद घेणारा, बँक , ऊसतोडणीसाठी चिठ्ठी फाडणारा, ह-या सारखे भुरटे चोर असे सारेच त्याची परीक्षा घेतात. परंतु मनूदा काळी धरती आणि निळं आकाश यावर विश्वास टाकून निश्चिंत होऊन जीवनातील संकटांना सामोरा जात असतो.
या सा-या गराड्यातून त्याला जगण्याच बळ देतात ते म्हणजे त्याची धर्मपत्नी, आबा, मजूर, मिञ, गुरं – ढोरं, शेळया-बक-या, टि. व्ही., सायकल, दुध डेअरी, इत्यादी. या शिवाय मनुदा असूच शकत नाही. हे सारे मनुदाचे मिञच आहेत.
दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक डॉ. श्रीकांत पाटील यांची ही ऊसकोंडी कादंबरी ही कष्टकरी शेतक-याची जीवन कहाणी मांडणारी उत्कृष्ट सत्य कथा आहे. प्रत्येक शेतकरी हा मनूदा सारखा सहनशील नसतो. तसेच प्रत्येक शेतक-याला शितल सारखी खांद्याला खांदा लावून लढणारी समाधानी पत्नी लाभत नाही. परिणाम नैराश्याने व्यथित होऊन अनेक शेतकरी आत्महत्या करतात व आपले जीवन संपवतात. परंतु डॉ श्रीकांत पाटील यांच्या कादंबरीतील नायक कर्जबाजारी होऊनही कधी त्या मार्गावरुन जात नाही. तर तो लढत रहातो. संकटाशी. यंञनणेशी. व्यवस्थेशी. परीस्थितीशी. निसर्गाशी. दैवाशी.
देव, धर्म काही नाही . सर्व काही थोतांड आहे हे तो जाणतो. तरीही संस्कृती, संस्कार, वरीष्ठांचा आदर म्हणून तो ते ही पाळतो. कारण आपला धर्म आपणच जपला पाहीजे याची त्याला जान आहे. तो विज्ञानवादी आहे. म्हणून केवळ देव आणि दैवावर विसंबून न राहता कष्ट, मेहनत, आधुनिक तंत्रज्ञान, रासायनिक तथा पारंपरिक खते यांचे भरवशावर जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतो. तो केवळ शेतीवर अवलंबून नाही. तर दुधदुभती जनावर संभाळून रोज डेअरी वर जातो. तो एकाच पिकावर अवलंबून रहात नाही. मध्ये मध्ये आंतरपिक घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करतो.
डॉ श्रीकांत पाटील यांची कादंबरी जगण्याच बळ देते. शेतीविषयी प्रेम दाखवते. खेड्याकडे चला म्हणते. जय जवान चा नारा देते. स्वतः गळक्या घरात राहून सिमेंटच्या जंगलातील …….. प्राण्यांना अन्न पुरवते. पशू, पक्षी, वनस्पती, वेली यावर प्रेम करायला शिकवते आणि म्हणूनच ही कादंबरी एका सकारात्मक ऊर्जेचा स्ञोत आहे.
ॲड सर्जेराव साळवे
६९, राज नगर मुकुंदवाडी
औरंगाबाद. मो नं: ८८०५०१३०८४.
Adv Sarjerao Salve have narrated very nicely the writting of Dr. Shrikant Patil i e. “Uskondi”. It’s a story of hardworking farmer, who struggling daily life for survival without dipression. His wife and old age father support him on every step in difficult condition. Due to his good nature all labour friends were support him. After natural disaster of heavy rain fall all crop destroy , but he again tries to take the crop of sugarcane.
For details please read the novel of Dr shrikant Patil, “Uskondi” .