सिंधुदुर्ग :
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील कोकण रेल्वेच्या प्रमुख सर्व स्थानकांचे लवकरात लवकर सुशोभिकरण करण्याची प्रक्रिया येत्या सात दिवसांत सुरु करा तसेच कोकण रेल्वेच्या सर्व स्थानकांच्या बाहेरील सर्व प्रमुख रस्ते क्रॉक्रींटकरण करण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज दिले. त्याचप्रमाणे कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी व कणवकवली येथे सुसज्ज रेल्वे पोलिस ठाणे उभारण्याच्या प्रक्रियेला वेग देण्याच्या सूचनाही मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिल्या. मंत्री चव्हाण यांच्या निर्णयामुळे कोकणवासियांना मोठया प्रमाणात दिलासा मिळणार असून लवकरच कोकण रेल्वेची स्थानके व परिसराचा कायापालट होणार आहे.
कोकण रेल्वे स्थानक ते मुख्य रस्त्यांना जोडणा-या रस्त्यांचे मजबूतीकरण, नुतनीकरण, तसेच स्थानकांचे सुशोभिकरण आदी विविध विषयासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कोकण रेल्वचे वरिष्ठ अधिकारी आणि रेल्वे पोलिस अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मुंबईसह देशातील प्रमुख विमानतळांचे उत्कृष्टरित्या सुशोभिकरण व अत्याधुनिकीकरण करण्यात आल्यामुळे प्रवाश्यांना उत्तम सोयी-सुविधा उपलब्ध होतात. याच धर्तीवर कोकण रेल्वेमार्गावरील सर्व स्थानकांचे सुशोभिकरण व आधुनिकीकरण करण्याच्या सुचना यावेळी मंत्री चव्हाण यांनी दिल्या. तसेच, कोकण रेल्वे प्रशासनाने सुशोभिकरणासंदर्भात पुढाकार घेणे अत्यावश्यक आहे, असेही मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले.
मुंबई- कोकणातून दरदिवशी हजारो प्रवासी कोकण रेल्वेने प्रवास करतात. परंतू, या हजारो प्रवाश्यांना रेल्वे स्थानकांवर तसेच या परिसरात कोणत्याही सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत, त्यामुळे प्रवाश्यांना नेहमीच विविध हालअपेष्टांना सामोरे जावे लागते. काही प्रमुख रेल्वे स्थानकांचा अपवाद वगळता कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानकांची अवस्था अतिशय वाईट आहे. त्यामुळे ही सर्व रेल्वे स्थानके लवकर सुसज्ज करावीत तसेच, या प्रक्रियेस विलंब न लावता येत्या सात दिवसांत याबाबत कार्यवाही सुरु करण्याचे निर्देशही मंत्री चव्हाण यांनी दिले.
कोकण रेल्वे स्थानकांकडे जाणाऱ्या अनेक रस्त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्था झाली आहे. हे रस्ते क्रॉकिंटीकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची तयारी असून या प्रमुख रस्त्यांच्या क्रॉकिटीकरणासाठी सुमारे १०० कोटी खर्च अपेक्षित आहे. कोकणवासी व मुंबईच्या चाकरमान्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हे रस्ते तयार करण्याची आमची पूर्ण तयारी असून यादृष्टीने कोकण रेल्वे प्रशानाने आम्हाला लवकरात लवकर ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर रस्त्यांचे काम युध्दपातळीवर सुरु करण्यात येईल, असेही मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले.
कोकण रेल्वे मार्गावर वारंवार अनेक अपघात होतात. तसेच, दरडी कोसळण्याच्या अनेक दुर्घटनाही होतात. त्यामुळे अशा आणीबाणीच्या परिस्थितीत अपघातग्रस्तांना तातडीने उपाययोजना व मदत करण्याच्या दृष्टीने या परिसरात सुसुज्ज पोलिस ठाणे व पोलिस चौकीची मागणी सातत्याने रेल्वे पोलिसांकडून करण्यात आली आहे. परंतू, कोकण रेल्वे प्रशासनाकडून या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याबाबत मंत्री चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे रत्नागिरी व कणकवली येथे दोन स्वतंत्र व सुसज्ज पोलिस ठाणे बनविण्यात यावीत, तसेच याच परिसरात ८ पोलिस चौकी नव्याने तयार करण्याबाबात कोकण रेल्वे प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने योग्य जागा उपलब्ध करुन द्याव्यात व त्यादृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री चव्हाण यांनी यावेळी उपस्थित कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांना दिल्या.
राजापूर रोड, सौंदळ, रत्नागिरी, भोके, आडवली, विलवडे, विलवडे, सावर्डा, चिपळूण, कामथे, दिवाणखवटी, कळंबणी, खेड, आयनी, मडुरा, सावंतवाडी, झाराप, कुडाळ, कणकवली, नांदगाव, खारेपाटण रोड, वैभववाडी रोड, आचिर्णे, सिंधुदूर्गनगरी या कोकण रेल्वे मार्गावरील प्रमुख स्थानकांना जोडणाऱ्या रस्त्यांचे काँक्रीटीकरणाचे लवकरात लवकर हाती घेण्याच्या सूचना मंत्री चव्हाण यांनी दिल्या. त्याप्रमाणे रत्नागिरी – दादर पॅसेंजर गाडी दिवा जंक्शनच्या ऐवजी दादर रेल्वे स्थानकापर्यंत करण्याबाबत तसेच सावंतवाडी – तुतारी एक्सप्रेसला नांदगाव स्थानकावर थांबा देण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन कोकण रेल्वेच्या अधिका-यांनी दिले. कोरोनाच्या काळात बंद पडलेली नांदगाव रेल्वे स्थानकावरील रो-रो सुविधा पुन्हा सुरु करण्याबाबत सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील असेही कोकण रेल्वेच्या अधिका-यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला माजी आमदार प्रमोद जठार,कोकण रेल्वेचे मुख्य अभियंता नागदत्त राव, वरिष्ठ अभियंता जे.एस.थोरात, सार्वजनिक बांधकाम विभागाचे एस.एन.राजभोज, एस.एन.गायकवाड, ए.ए.ओटवणेकर, ए.एम.रमेश, अजयकुमार सर्वगोड, अनामिका जाधव, मध्य रेल्वेचे डिसीपी मनोज पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगत, कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य विजय केनवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.