चेन्नई :
भारतीय नौदलाच्या आयएनएस चेन्नई या युद्धनौकेवरुन रविवार दि. १८ ऑक्टोबर रोजी ‘स्वदेशी ब्राह्मोस, या ‘सुपरसॉनिक क्रुझ’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. क्षेपणास्त्राला अरबी समुद्रातील एका लक्ष्यावर अचूक हल्ला करायचा होता. ही चाचणी यशस्वी झाली. अतिशय उच्च दर्जाचे या चाचणीसाठी वापरण्यात आले. चाचणी यशस्वी झाल्यामुळे लांबच्या पल्ल्याचे लक्ष्य नष्ट करण्याचे सामर्थ्य युद्धनौकांना मिळाले आहे.
ब्राह्मोस या क्रुझ क्षेपणास्त्राद्वारे ४०० किमी लांबच्या लक्ष्याचा अचूक लक्ष्यभेद करता येतो. एक रॅमजेट सुपरसॉनिक क्रुझ क्षेपणास्त्र असल्यामुळे ब्राह्मोस पाणबुडी, युद्धनौका, लढाऊ विमान, तसेच जमिनीवरील मोबाइल लाँचर यावरुन डागता येते. भारत आणि रशिया यांनी संयुक्तपणे या क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे. या क्षेपणास्त्राची पहिली आवृत्ती २९० किमी लांबच्या लक्ष्याचा अचूक लक्ष्यभेद करण्यास सक्षम होती. आणखी विकास करुन ब्राह्मोस चा पल्ला वाढवण्यात यश मिळाले आहे.
*लक्ष्याचा अचूक भेद करण्याची क्षमता*
भारत आणि रशियासाठी ‘ब्राह्मोस एअरोस्पेस’ ब्राह्मोस या सुपरसॉनिक क्रुझ क्षेपणास्त्राची निर्मिती करते. भारताने याआधी लढाऊ विमानातूनही ब्राह्मोसची यशस्वी चाचणी घेतली आहे. ब्राह्मोस क्षेपणास्त्र दिवसाच्या कोणत्याही वेळी आणि कोणत्याही वातावरणात निश्चित केलेल्या लक्ष्याचा अचूक भेद करण्यासाठी सक्षम आहे.
*संरक्षण मंत्र्यांकडून अभिनंदन*
चाचणी यशस्वी झाल्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ , ब्राह्मोस आणि भारतीय नौदलाचे अभिनंदन केले.
*नौदलाच्या सामर्थ्यात वाढ*
चाचणी यशस्वी झाल्यामुळे भारतीय नौदलाच्या क्षमतेत वाढ झाल्याचे संरक्षणमंत्री म्हणाले. डीडीआर अँड डीचे सरचिटणीस आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी सतीश रेड्डी यांनी ब्राह्मोस क्षेपणास्त्रावर काम करणारे तंत्रज्ञ, संशोधक, डीआरडीओ आणि भारतीय नौदलाचे अभिनंदन केले. नौदलाचे सामर्थ्य वाढवण्यासाठी हा चाचणी महत्त्वाची होती आणि ती यशस्वी झाल्याचा मला आनंद आहे, असे ते म्हणाले.