नोएडा :
दिल्लीजवळील नोईडा या शहराजवळ रविवारी अचानक ‘एलियन’ अवतरला आणि परिसरातील लोकांची त्याला पाहण्यासाठी धांदल व तो कसा असेल यावरुन त्रेधातिरपीटही उडाली. पोलिसांचीही अशीच अवस्था झाली होती. अखेर जेव्हा त्याची सत्यता समजली तेव्हा सगळ्यांचीच फजिती झाली.
निसर्गात अनेकदा कधीही न पाहिलेले वेगवेगळे जीव आढळून येतात. तेव्हा लोकांना त्याबाबत उत्सुकता निर्माण होते. असाच प्रकार ग्रेटर नोएडामधील भट्टा-पारसोल गावात शनिवारी घडल. काही लोकांना आकाशात एलियनसारखी आकृती उडताना दिसली. कानोकानी ही बातमी परिसरात वा-यासारखी पसरली.
हा एलियन्ला कसा आहे हे पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली. मात्र त्याच्याबद्दल मनात भीतीही होती. आकाशात उडत असलेली ही आकृती काही वेळाने खाली आली व एका झाडावर अडकून बसली. तेव्हा हा एलियन नक्की आहे तरी कसा, हे पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली. वेगवेगळ्या चर्चांना उत आला. अगदी पोलिसांना देखील त्या एलियनजवळ जाण्याची हिंमत होत नव्हती. मात्र एकाने हिंमत दाखवून त्याला खाली उतरविले.
त्यानंतर तपासणी केली असता तो एलियन नसून एक मोठा फुगा आहे असे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांसह नागरिकांनीही सुटकेचा निश्वास सोडला. मात्र आपली कशी फजिती झाली यावरुन प्रत्येक जण एकमेकांवर हसत होता. हा फुगा आकाशात कोणी सोडला? का सोडला? या गोष्टींचा पोलिसांकडून तपास सुुरु आहे.