*वक्रतुंड साहित्य समूहाचे प्रशासक लेखक कवी जगन्नाथ खराटे लिखीत अप्रतिम समाजप्रबोधनपर लेख..*
*समन्वय..*
नुकतीच दिवाळी संपली होती.अन दिवाळीच्या सुट्टीत जरा बाहेरगावी जाऊन यावं असं वाटलं. अन् मग अचानकपणे आठवलं. मागे काही दिवसांपूर्वीच मित्रांने फोन करुन, घरी यायचं आमंत्रण दिलं होतं.अन मग दिवाळीच्या सुट्टीत,मित्राकडे जायचा बेत आखला. बर्याच दिवसांनी गेल्यावर मित्रांने आणि त्याच्या कुटुंबानै चांगलं आदरातिथ्य केलं, मित्राच्या कुटुंबातील सर्वजण अगदी आनंदी दिसत होते. त्यांच्या त्या खेळीमेळीच्या वातावरणाने अगदी भारावून गेलो. सारेजण, घरातील अगदी सर्व कामे अगदी ठरवून दिल्या प्रमाणे करीत होते अन् कुठेही कुरबुर नाही की आदळ आपट नाही, मित्राच्या सौभाग्यवतीचं तर कौतुकंच करावंसं वाटलं, “घर असावं तर असं” हे राहून राहून वाटत होतं.. पाहुणचार,अन् सुखदुःखाच्या मनोसोक्त गप्पाटप्पा झाल्या अन्, परतीच्या प्रवासाला लागलो, मित्राला जरा बाजूला घेऊन म्हणालो “तुला एक विचारू का? , तो लगेच म्हणाला अरे अजून बोलायचं बाकी आहे का?? बोल …बिनधास्त विचार,,, मी म्हणालो “अरे तुझ्या कुटुंबांत हे असं सलोख्याचं आनंदाचं वातावरण नेहमीच असते का? अन् जर नेहमी असेल तर ह्याचं गुपित काय आहे” ???…
तो , लगेच म्हणाला,अरे, एवढं विशेष काही नाही त्यांत,,मित्रा एक सांगू, अरे हे असं वातावरण ठेवायला मला कुटुंबातील सर्वांना समजून घ्यावं लागतं. कधीकधी लहानसहान कुरबुरी होतात,भांड्याला भांडं लागतं.पण त्याचा आवाज बाहेर जायला नको ह्यासाठी जपावं लागतं मला ..अन् सर्वात महत्वाचं म्हणजे मी माझे विचार जरा बाजूला ठेवून, सर्वांना सोबत घेऊन चालतो,, अन् सर्वामधील विचारांचा, “समन्वय” साधत असतो..
मी हे सारं ऐकत होतो अन् डोक्यात लख्ख प्रकाश पडला.. खरंच समन्वय हे जिवनातलं अत्यंत महत्त्वाचं गुपित मला कळालं होतं..
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात, सर्व ठिकाणी अगदी ,आपलंच ते खरं करण्यासाठी धडपड, किंवा अहमिका चाललेली दिसतं आहे, प्रत्येक घरात नवरा बायको, मुलं, मुली, ह्यांच्यांत सदैव आपलंच मत चांगलं, आपले विचार चांगले,अन् आपल्या मनासारखं वागण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. आईबाबांचे विचार हे जुन्या काळातील आहे ,अन् आता त्यांनी आमच्या मतानुसार चाललं पाहिजे, त्यांनी जरा बदललं पाहिजे असं मुलांचं मत हमखास पाहायला मिळतं. तर जुन्या पिढीतील आईबाबांना वाटतं की ह्या नविन पिढीने आपलं म्हणणं ऐकून घ्यायला हवं..आम्ही आमच्या आईबाबांना मान देत होतो, त्यांच्या विचारानुसार लागतं होतो, अन्, कुळाची मानमर्यादा राखंत होतो. पण हल्लीची ही मुलं पार बिघडून गेली, आईबापांचे विचार पटत नाही,अन् जीव तोडून सांगितले तर ऐकंत तर नाहींत पण पार वेड्यांत काढतात, कसं होणार ह्यांचं.?. देवा, तुंच बघ बाबा”.. असं म्हणुन खिन्न मनाने मुकाटपणे हे सारं सहन करत असतात. ह्यावर काही उपाय नाही असं वाटून नशिबाला दोष देत कुंठित आयुष्य जगत असतात. हे आजच्या समाजाचं भिषण वास्तव आहे..
खरंच,समाजातील हे भयानक वास्तव पाहून मला मित्रांने सांगितलेला तो विचार पटला होता.. “समन्वय” हा एक रामबाण उपाय आहे,,अन् सद्ध्या तर हा ,समन्वय, कुठं राहिलांच नाही.. ह्या अनुषंगाने अचानक एक जुनं गाणं आठवलं, “असा जगाचा चाले हा खेळ,नाही कुणाचा कुणाला मेळ,.. किती छान लिहिलंय हे कवीनं हे गीत!!. सद्ध्याच्या जगात गोंधळाचा हा खेळ असां निरंतर चालू आहे, अन्, ह्यात कुणाचा कुणाला मेळंच उरला नाही. अन् ,समन्वय म्हणजेंच मेळ….
खरंच,आईवडीलांनी जन्माला घातले, त्यांचे उपकार, त्यांचे विचार मुलांना पटतं नाही, अन् सदानकदा घरांत कुरबुरी ह्या सुरु असतात.. अशा प्रकारे आईबाबा अन मुलांच्या विचारांच मेळ नाही,, समन्वय नाही.. बाहेरच्या जगात सुद्धा हिंच परिस्थिती दिसते.. समाजातील जनता अन् पुढारी ह्याच्यांत समन्वय नाही,हे तर आपन रोज पाहतो.. मतदानाच्या वेळी दारोदार फिरून मताचा जोगवा मागणारे अगतिक पुढारी, निवडुन आल्यावर मतदाराला पुर्णपणे विसरुन जातात, जनतेच्या विचारांशी त्यांच्या भल्याशी, सुखदुःखाशी त्यांना काही घणंदेनं नाही असं वागताना दिसतात,,
समन्वयासंदर्भात मला लहानपणीची गावची ती घटना अजुनही आठवते. लहान असताना आम्ही कुंभाराच्या घरी जायचो,अन् तिथे कुंभार मऊ मुलायम अशा मातिच्या ओल्या गोळ्याला मोठ्या लाकडी चाकावर ठेवायचे,अन् एका लांब काठीने ते लाकडी चांक फिरवायचे.मग अगदी हळुवारपणे हाताने त्या गोळ्याला हवा तसा आकार द्यायचे..अन् सुंदर मडकी, पणत्या, सुरई अशा दैनंदिन जिवनातल्या उपयोगी गोष्टी बनवायचा. तेव्हा काही कळंत नसे, पण आता मात्रं त्यातलं समजू लागलं ह्या सर्व गोष्टी बनवण्यासाठी कुंभाराच्या हळूवार हाताची हातोटी,, मातिची लवचिकता अन् चाकाची गती ह्यांच्यांत एक सुंदर असा समन्वय किंवा मेळ साधला जावून सुंदर कलाकृती बनत असे..
खरंच, कुंभाराच्या अन् त्या सर्व गोष्टींपासून आपण समन्वय कसा साधावा हे शिकायला हवं..अन् तो समन्वय साधला तर मानसाचं जिवन जगने अगदी सुखकर होईल. किंबहुना समन्वयाने जिवनांचं नंदनवन होते हे नेहमीच लक्षांत ठेवायला हवं.
©️जगन्नाथ खराटे-ठाणे