*तक्रारीनंतरच कसे दिसले पोलिसांना गैरधंदेवाले…? : नितेश राणेंचा सवाल*
महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे अभिमानाने पाहिले जाते परंतु तोच सिंधुदुर्ग जिल्हा गैरधंदे करणाऱ्यांचे कुरण झाले म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गोवा बनावटीची दारू वाहतूक, विक्री, पानपट्टी खाणारे कमी झाले तरी रस्तोरस्ती उभ्या राहणाऱ्या स्टॉलवर राजरोसपणे खेळला जाणारा मटका, गाव, शहर, जत्रा, महोत्सव, आणि सोशल क्लब या गोंडस नावाखाली खेळला जाणारा जुगार, अफू, गांजा सारखे अंमली पदार्थ विक्री आदी अवैध धंद्यांमुळे जिल्ह्याची बदनामी होत आहे. देवगड-जामसंडे नगरपालिका आमदार नितेश राणे यांच्या मतदारसंघात येते आणि गेल्या काही महिन्यांपासून या भागात काही सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या आणि काही पोलीस अधिकाऱ्यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू असून ते कोणाकोणाचे आहेत याची नावे देखील पोलिसांकडे दिली असल्याचे सांगून सदरचे गैरधंदे तात्काळ बंद व्हावेत व आरोपींवर योग्य ती कारवाई करावी असे सांगत आम.नितेश राणे यांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता.
आम.नितेश राणे यांच्या इशारा व तक्रारीनंतर जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक श्री.अग्रवाल यांनी तात्काळ दखल घेत आम.नितेश राणे यांच्या समोरच देवगड पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना देवगड परीसरात अवैध धंदे व अंमली पदार्थांची विक्री होत असेल तर ती खपवून घेतली जाणार नाही असा कडक इशारा दिला. त्यामुळे आम.नितेश राणे यांनी त्यांचे कौतुक देखील केले. अग्रवाल हे कर्तव्यदक्ष अधिकारी असून त्यांनी सुरू केलेली कार्यवाही योग्य असल्याने व देवगड पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केल्याने तुर्तात आपण मोर्चा स्थगित केला नसला तरी देवगड पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष ठेवून आहे, पोलीस तपास कुठल्या दिशेने जातो, शहरामध्ये किती शिस्त लागते हे पाहण्यासाठी आपण वाट पाहत असून ज्यावेळी आपल्याला परत कळेल की गैरधंदे आणि अंमली पदार्थ विक्री पुन्हा सुरू झाली तेव्हा योग्यवेळी कोणतीही सूचना न देता पोलीस स्टेशनवर गरज भासल्यास मोर्चा घेऊन जाईन असा इशाराच दिला. आपल्या तक्रारीनंतरच देवगड पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केल्याने जे लोकप्रतिनिधी, आरोपी गैरधंदे करतात त्यांच्यावर कारवाई होते म्हणजे देवगड पोलिसांना अवैध धंदे कोक कोण करतात त्याची पूर्णतः माहिती होती, तरी देखील कारवाई करण्यासाठी कोणाची वाट पाहत होते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
देवगड जामसंडे नगरपरिषद क्षेत्रात सुरू असलेल्या गैरधंद्यांमुळे शहरातील तरुण तरुणींचे आयुष्य बरबादीकडे जात आहे, त्यामुळे शहराला शिस्त लागावी आणि गैरधंदे पूर्णतः बंद व्हावेत यासाठी आपण पुढाकार घेतला असून पोलिसांनी कारवाई केली ही केवळ राज्यात बाळासाहेबांची शिवसेना-भाजपा युतीचे सरकार आहे. आज नाम.देवेंद्रजी फडणवीस यांच्यासारखे सक्षम गृहमंत्री आहेत यामुळेच. आपण सदर घटनेची माहिती व निवडक पोलीस अधिकारी यांचे अवैध धंदेवाल्यांशी असलेले संबंध यांच्या नावानिशी गृहमंत्री देवेंद्रजीं फडणवीस यांच्याकडे देणार असल्याची देखील त्यांनी माहिती दिली. देवगड परिसर आंबा बागायती व नैसर्गिक सागरी संपत्ती यामुळे सधन असलेला भाग. परंतु याच साधनसंपत्तीच्या जीवावर मोठे झालेले व लोकप्रतिनिधी म्हणून वावरत असलेले काही धनिक लोक अवैध धंदे करून मोठ्या प्रमाणावर पैसा गोळा करतात आणि तरुणाईला देशोधडीला लावतात. जिल्ह्यात आज देवगडच नव्हे तर दोडामार्ग, सावंतवाडी ते देवगड पर्यंत संपूर्ण जिल्हा हा अवैध धंद्यांची कीड लागून पोखरला जात आहे. परंतु स्वतःची संपत्ती वाढविण्याच्या नादात लोकप्रतिनिधी आणि आपल्याला मिळालेली जिल्ह्यातील पोस्टींग सत्कारणी लावून बक्कळ पैसा जमविण्याच्या छंदात निवडक पोलीस अधिकारी जिल्ह्याची दुर्दशा करत आहेत. उघड्या डोळ्यांनी जिल्ह्याची वाट लागताना जिल्हावासीय हताशपणे पाहत आहेत, तरुण पोरं देशोधडीला लागताना आई बाप अश्रू गिळून चिडीचूप राहून जिल्ह्यातील ही दयनीय अवस्था कधी बदलणार ? असा प्रश्न परमेश्वराला विचारत आहेत यापेक्षा दुर्दैव ते काय…?