You are currently viewing जिल्ह्यातील आवश्यक सुधारणा मनसेने नूतन पोलीस अधीक्षकांच्या आणल्या निदर्शनास

जिल्ह्यातील आवश्यक सुधारणा मनसेने नूतन पोलीस अधीक्षकांच्या आणल्या निदर्शनास

प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या शिष्टमंडळाने अधीक्षक अग्रवाल यांची घेतली भेट

ओरोस

मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखालील मनसे शिष्टमंडळाने जिल्ह्याचे नूतन पोलीस अधिक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल यांची भेट घेवून विविध विषयांवर चर्चा केली.सुरक्षा व सुरक्षितता यांच्या निश्चितीसाठी ग्रामसुरक्षा दल,मोहल्ला एकता समिती यासारखे उपक्रम राबवून पोलिसांसोबत जनतेलाही सक्रियपणे सहभागी करून घ्यावे, जिल्ह्यातील वाढत्या चोऱ्यांच्या घटना पाहता रात्रीच्या वेळेस पोलीस पेट्रोलिंग गस्त वाढवणे, हायवेवरील सीसीटीव्ही यंत्रणा पुनर्जीवित करणे,आंतरराज्य स्थलांतरण कायद्यातील तरतुदींप्रमाणे परजिल्ह्यातील स्थलांतरित कामगारांची काटेकोरपणे नोंदणी करणे इत्यादी घटकांवर विशेष भर देण्याबाबत मनसेने पोलीस अधिक्षकांचे निवेदन देऊन लक्ष वेधले.

तसेच जिल्हयात गोवा बनावटीची बेकायदा दारू विक्री, मटका, जुगार, चरस-गांजा यासारखे अमली पदार्थ पुरवणारे रॅकेट,काही ठिकाणी वेश्या व्यवसाय इत्यादी अवैध व्यवसाय वाढीस लागले असून परिणामी युवा पिढी व्यसनांच्या आहारी जाताना दिसत आहे.

जिल्हयात गोवा बनावटीची दारू गावागावापर्यंत पोहचवली जात असून दारू वाहतूक करणारे व विक्री करणाऱ्यांबाबत त्या त्या ठिकाणच्या पोलिस बीट हवालदारांना माहिती असुन संगनमताने सदरचे प्रकार चालू आहेत. तसेच मटका , जुगार , काही ठिकाणी वेश्याव्यवसायासोबत चरस-गांजा-हेरॉईन आदी अमली पदार्थाचाही सुळसुळाट सुरू झालेला दिसून येत आहे.

यामध्ये उच्चशिक्षित, कॉलेज विद्यार्थी शिकणारे अमली पदार्थाच्या आहारी जाऊ लागलेले असून तरुण पिढी अक्षरशः बरबाद होताना दिसत आहे.वेळीच ह्यावर आळा बसण्याची गरज असून अवैध व्यवसायांचा मुळासकट बीमोड करावा, मनसेचे पदाधिकारी पोलीस प्रशासनास आवश्यक सहकार्य करतील अशी मागणी करणारे निवेदन देखील सादर केले.

येत्या काही दिवसांत जिल्हावासीयांना नक्कीच काही बदल दिसतील असे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिले.यावेळी उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री,कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,सचिव राजेश टंगसाळी,अमित इब्रामपुरकर,कुणाल किनळेकर,अमोल जंगले,वैभव धुरी,संतोष कुडाळकर,संतोष सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा