*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री पूनम सुलाने लिखीत बाल दिवस विशेष लेख*
*स्वीकार बालपणाचा*
“इवल्याशा बाल मनावरती
नको ओझे अशा अपेक्षांचे
जाणूनी सुप्तगुण तयामधले
देऊ आकाश नव्या विश्वासाचे”
14 नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान यांचा जन्मदिवस ‘मुले ही,देवाघरची फुले’ असे नेहमी म्हणणारे चाचा नेहरू यांना गुलाबाच्या फुलांप्रमाणे छोटी मुले देखील विशेष आवडत असे,त्यामुळे त्यांचा जन्मदिवस बाल दिवस म्हणून साजरा केला जातो.
गुलाबाच्या फुलाप्रमाणे नाजूक आणि अगदी असेच हळूहळू उमलत एक दिवस आपल्या कर्तव्याचा सुगंध उधळीत आपले तसेच आपल्या कुटुंब व समाजाचे नाव मोठे करत करत संपूर्ण विश्वासाठी एक आदर्श व्यक्ती म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या व्यक्तित्वाची खरी सुरुवात ही लहानपणी कुटुंबातील संस्कार तसेच अवतीभोवतीच्या समाजातील वातावरणामध्ये होत असते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीचा पूर्णपणे विकास होण्यासाठी मूलभूत गरजा जितक्या जास्त प्रमाणात आवश्यक आहे तितक्याच जास्त प्रमाणात बालपणामध्ये त्याच्यावर होणारे संस्कार व कुटुंबातील सर्व व्यक्तीकडून योग्य वेळी योग्य मार्गदर्शन त्याला हवा असलेला योग्य वेळ, प्रेम,सहानुभूती हे देखील खूप आवश्यक आहे. अंगणात लावलेले एखादे छोटेसे रोपटे वाढताना जितकी देखरेख आवश्यक असते तितकीच देखरेख घरातील छोट्या मुलांना देखील आवश्यक असते. त्यांच्यामध्ये असलेले सुप्त गुण जाणून घेणे म्हणजे येता जाता त्यांचा आत्मविश्वास कमी होईल असे प्रश्न विचारणे नव्हे, अनेक पालकांना आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करण्यामध्ये काहीच वाटत नाही,अशा पालकांसाठी इतकेच सांगावे असे वाटते कि, एखाद्या गुलाबाच्या फुला शेजारी मोगऱ्याचे रोपटे लावले आणि सारखे सारखे मोगऱ्याच्या रोपट्याला गुलाबाची फुले यायला हवी असे सांगितले तरी देखील मोगऱ्याच्या रोपट्यावर आलेले फुल हे मोगऱ्याचे असतील गुलाबाचे नाही आणि ज्याप्रमाणे मोगऱ्याचे फुल कधीच गुलाबाचे फुल बनत नाही हे जितके शक्य आहे तितकेच आपल्या मुलांची इतरांशी तुलना केल्याने आपली मुले तशी तर बनत नाही याउलट त्यांच्यामध्ये असलेला आत्मविश्वास हा देखील कमी कमी होत जातो म्हणूनच त्यांची तुलना इतरांशी करण्यापेक्षा त्यांच्यामध्ये जो विशेष गुण आहे त्याच्याबद्दल जाणून त्यामध्ये आणखी किती सुधार करता येईल याबद्दल बोलले गेले तर नक्कीच हवा असलेला बदल आणि त्यांच्यामध्ये असलेल्या आत्मविश्वासाला वाढवण्याची छोटी सी सुरुवात आपण करू शकतो.
बदलत्या काळाबरोबर सर्वांच्या गरजा देखील बदलल्या आहे आणि त्याप्रमाणे सगळ्यांचे राहणीमान देखील खूप प्रमाणात बदलले आहे, पूर्वीप्रमाणे घरातील आजी-आजोबांचा हवा असलेला सहवास आता घरातील मुलांना शक्य नाही दिवसातील अनेक तास आई-वडील देखील कामानिमित्त बाहेर असल्यामुळे आजचे बालपण एकट्यापणास बळी पडत आहे. अशावेळी त्यांना मिळेल त्या दिशेने भरकटत जाणारे बालपण आणि त्यातून घडणारे दुष्परिणाम आपण सर्वजण अनेक ठिकाणी होताना पाहत आहोत. म्हणूनच यासाठी कोणत्याही गोष्टीची आवश्यकता आपल्याला किती प्रमाणात आहे, हे जाणून घेऊन आपल्याला कोठे थांबायला हवे हे समजून प्रत्येक पालकाला आपल्या मुलांची जबाबदारी संभाळण्यासाठी पुरेसा वेळ देणे खूप गरजेचे आहे. आजची छोटी मुले येणाऱ्या काळात आपल्या देशाचे तसेच विश्वाचे भविष्य आहे त्यामुळे हे भविष्य जर योग्य असायला हवे असे प्रत्येकाला वाटत असेल तर प्रत्येकाने वर्तमानातील बालपणाचा स्वीकार करून आपल्या अशा अपेक्षांचे प्रमाणापेक्षा जास्त ओझे त्यांच्यावर न लादता त्यामध्ये असलेल्या गुणांना समजून त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्यासाठी एक नवे विश्वासाचे आकाश निर्माण करण्याची गरज आहे हे जाणून घेतले पाहिजे.
*पूनम सुलाने-सिंगल,महाराष्ट्र*