*जागतीक साकव्य समूह सदस्या लेखिका कवयित्री सौ ज्योत्स्ना तानवडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या “देवमाणूस” या स्मृती संग्रहाचा लेखिका कवयित्री सौ.राधिका भांडारकर यांनी दिलेला पुस्तक परिचय*
पुस्तकाचे नाव : *’देव’माणूस*
संकल्पना: सौ.ज्योत्स्ना तानवडे.
प्रकाशक:सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन
प्रकाशन:२९/०५/२०२२
*सौ ज्योत्स्ना तानवडे यांच्या संकल्पनेतून साकारलेलला *’देव’माणूस* हा स्मृति संग्रह नुकताच वाचनात आला आणि त्याविषयी आवर्जून लिहावं असं वाटलं म्हणून——
सौ. ज्योत्स्ना तानवडे यांनी अत्यंत कृतज्ञतापूर्वक भावनेने, त्यांचे परमपूज्य वडील कै. श्री. बाळकृष्ण अनंत देव तथा श्री आप्पासाहेब देव, माळशिरस. यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने या पुस्तक रूपाने एक आगळीवेगळी श्रद्धांजली त्यांना अर्पण केली आहे.
*’देव’माणूस* ही स्मरणपुस्तिका आहे आणि या पुस्तकात जवळजवळ ५८ हितसंबंधितांनी कै. आप्पासाहेब देव यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
ही भावांजली वाचताना कै. आप्पासाहेब देव या महान, ऋषीतुल्य, समाजाभिमुख, लोकमान्य व्यक्तीचे अलौकिक दर्शन होते. वास्तविक तसे म्हटले तर ही स्मरणपुस्तिका सौ. ज्योत्स्ना तानवडे यांचा समस्त परिवार, नातेवाईक, स्नेही, मित्रमंडळी अथवा त्यांच्या संबंधितांतल्या व्यक्तींचा स्मृती ठेवा असला तरी माझ्यासारख्या अनोळखी व्यक्तींसाठी सुद्धा हे पुस्तक जिव्हाळ्याचे ठरते हे विशेष आहे. अर्थातच त्याचे कारण म्हणजे या सर्वांच्या आठवणींच्या माध्यमातून झिरपणाऱ्या एका अलौकिक व्यक्तीच्या दिव्यत्वाच्या प्रचितीने खरोखरच आपलेही कर सहजपणे जुळले जातात. हा देवमाणूस सर्वांचाच होऊन जातो.
*नित्य स्मरावा!*
*उरी जपावा !!*
*मनी पूजावा !!!*
अशीच भावना वाचणाऱ्यांची होते. म्हणूनच हे पुस्तक केवळ त्यांच्याच परिवाराचे न उरता ते सर्वांचेच होते.
नावातही देव आणि व्यक्तिमत्वातही देवच म्हणून हा *’देव’माणूस!*कै. बाळकृष्ण अनंत देव* तथा *आप्पासाहेब देव* यांचा २९/०५/१९२२ ते १५/०२/१९८८ हा जीवन काल. त्यांचे बाळपण, वंशपरंपरा, शालेय जीवन, जडणघडण, सहजीवन, पारिवारिक, व्यावसायिक, सामाजिक जीवनाविषयीचा त्यांच्या कुटुंबीयांनी आणि संबंधितांनी स्मृतिलेखनातून घेतलेला हा आढावा अतिशय वाचनीय, हृद्य आणि मनाला भारावून टाकणारा आहे.
सोलापूर जिल्ह्यातल्या *माळशिरस* या गावी स्थित राहून वकिलीचा पेशा सांभाळून स्वतःच्या समाजाभिमुख, कलाप्रेमी, धार्मिक वृत्तीने गाव आणि गावकरी यांच्या विकासासाठी अत्यंत तळमळीने झटणाऱ्या, धडपडणाऱ्या एका लोकप्रिय अनभिषिक्त राजाची, लोकनेत्याची एक सुंदर कहाणी, निरनिराळ्या व्यक्तींनी सादर केलेल्या आठवणीतून साकार होत जाते.
*वडिलांच्या आठवणीत रमलेली* *ज्योत्स्ना लिहिते,* *”…..तुमचे व्यक्तिमत्व होतेच चतुरस्त्र!* *किती रुपे आठवावी तुमची!* *वकिली कोट घालून कोर्टात बाजू मांडणारे तुम्ही*, *शाळेत झेंडावंदन करणारे! सोवळे* *नेसून खणखणीत आवाजात महिम्न म्हणणारे तुम्ही,* *पांढरा पोषाख, कपाळी बुक्का, गळ्यात टाळ घालून वारीत अभंग म्हणणारे तुम्ही*,. *मुलांनातवंडांच्या गराड्यात,चांदण्यात ओसरीवर पेटी वाजवणारे, कटाव गाणारे तुम्ही…* *तुमचे व्यक्तिमत्व खूपच खास होते…”*
*मोहिनी देव*_ त्यांची सून सांगते,
” मला आयुष्यात कुठल्याही गोष्टीचा अभिमान वाटला नाही. वाटला फक्त ती. आप्पासाहेब यांची सून म्हणवून घेण्याचा…”
आप्पासाहेब एक दुर्मिळ व्यक्तिमत्व, एक आधुनिक धर्मात्मा, एक देव माणूस, एक स्वयंभू व्यक्तिमत्व, एक ऊर्जा स्त्रोत, अनाथांची माऊली, अशी भावपूर्ण संबोधने देऊन अनेकांनी त्यांना भावांजली अर्पण केली आहे. ते वाचताना मन हरखून जाते.
*मोहन पंचवाघ* त्यांच्याबद्दल म्हणतात,
“… त्यांचा पहाडी आवाज, बुद्धिमत्ता, कोर्ट कामाची एकूणच पद्धती यामुळे अख्ख्या माळशिरस मध्ये त्यांचा दरारा, दबदबा, वचक होता. पण त्यांच्याबद्दल सर्वांच्या मनात आदरयुक्त भावना होती. त्यांच्याकडे समस्या घेऊन जाणारी व्यक्ती कधीही विन्मुख परत गेली नाही….”
*मदन भास्करे* म्हणतात,
” असंख्य पक्षकारांना धीर आणि न्याय देण्याचे महान पुण्य कर्म आप्पासाहेबांनी जीवनभर केले. कित्येकांकडून त्यांनी एक पैसाही फी म्हणून घेतली नाही. उलट कोर्ट फी सुद्धा वेळ आली तर ते स्वतःच भरत. असा हा महात्मा!….”
सर्वांच्या स्मृती लेखनामध्ये उत्स्फूर्तपणा जाणवतो. अत्यंत जिव्हाळ्यांने, आपलेपणाने आणि प्रामाणिकपणे व्यक्त झालेली शुद्ध मने इथे आढळतात. म्हणून हे पुस्तक म्हणजे विचारांची, आचारांची, संस्कारांची चालती बोलती गाथाच वाटते.
या पुस्तकात एका आदर्श व्यक्तीची कहाणी वाचत असताना, अदृश्यपणे त्यांच्या पाठीशी सावलीसारखी वावरणारी एक दिव्य व्यक्ती म्हणजे *कै. मालतीबाई देव— या लोकनायकाची सहचारिणी. एक सुंदर, हसतमुख, प्रसन्न, कलाप्रेमी, सुसंस्कृत, धार्मिक, पतीपरायण, सामाजिक जाणीवा जपणारी, सुगरण आणि सुगृहिणी. अनेक भूमिकांतून व्यक्त होणारं, *सौ. मालतीबाई देव हे व्यक्तिमत्वही तितकच मनावर बिंबतं . आणि प्रत्येकाच्या आठवणीतून त्याचा उल्लेख झाल्याशिवाय राहात नाही.एक शून्य पुढे टाकल्यानंतर संख्येची किंमत जशी वाढते तद्वतच *कै. मालतीबाई देव* यांचं अस्तित्व कै. आप्पासो देव यांच्या जीवनात होतं.
हे पुस्तक वाचून झाल्यावर मी ज्योत्स्नाला म्हटले,
” ही स्मरणपुस्तिका केवळ तुमच्या पुरती नसून ती परिचित अपरिचित सर्वांसाठीच, आपली वाटणारी आहे”
हे स्मरण पुस्तक प्रसिद्ध करण्यामागे ज्योत्स्नाची भूमिका, पुढच्या पिढीला या आदर्श व्यक्तिमत्त्वांची सदैव ओळख रहावी आणि त्यातून त्यांचीही मने संस्कारित व्हावीत ही तर आहेच. पण आज आपण समाजातलं जे तुटलेपण, संवादाचं, नात्यांचं हरवलेपण अनुभवत आहोत त्यासाठीही अशा पुस्तकांचे वाचन, माणसाला जीवनाविषयी, जगण्याविषयी विचार करायला लावणारं, मागे वळून पाहायला लावणारं, आपल्या संस्कृती, परंपरा याविषयीच्या महानतेचा पुनर्विचार करायला लावणारं ठरतं.
आणि खरोखरच समारोपात जेव्हा ज्योत्स्ना म्हणते,
*आठवताना स्मृती साऱ्या*
*कंठ पुन्हा दाटून येतो*
*त्यांच्या पोटी पुन्हा जन्म दे*
*विठुरायाला विनवितो …*
तेव्हा या ओळींवरच आपले श्रद्धांजली पूर्वक अश्रूही नकळत ओघळतात .
*राधिका भांडारकर. पुणे*