सावंतवाडी
सध्या साहित्याची परिभाषा बदलत आहे. असे असतानाही शेकडो वर्षांपूर्वी संत जनाबाई, संत सोयराबाई, संत तुकोबाराय, महात्मा बसवेश्वर अशा अनेक महनीय व्यक्तींनी आपल्या लेखन साहित्यातून मानवतावाद सांगितला. त्यांच्या साहित्यात सामान्य माणसाचे जगणे रेखाटले आहे. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय!’ अशी तत्त्वप्रणाली घेऊन निर्माण झालेले हे साहित्य जगण्याचे तत्त्वज्ञान सांगत असते. असेच साहित्य हे खरे आणि दर्जेदार साहित्य असते, असे प्रतिपादन कॉम्रेड संपत देसाई यांनी सावंतवाडी येथे व्यक्त केले.
शनिवारी सायंकाळी सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरात आयोजित केलेल्या ‘समाज साहित्य संमेलना’च्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर, ज्येष्ठ लेखक व कवी अजय कांडर, संमेलनासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध कवयित्री तथा महाराष्ट्र स्टेट टॅक्सच्या डेप्युटी कमिशनर अंजली ढमाळ (पुणे) व साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कवी संमेलनाच्या अध्यक्ष मनीषा पाटील उपस्थित होत्या.
यावेळी संमेलनाध्यक्ष कॉम्रेड देसाई पुढे म्हणाले की, आमच्या पूर्वजांनी ज्या पद्धतीने साहित्याची कास धरून ग्रंथ निर्मिती केली, त्यात बहुजनवाद दिसतो. सामान्य माणसाचे जीवन चरित्र रेखाटताना घामाचा दाम, कष्टकऱ्यांचे श्रम आणि मातीची किंमत अशा अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर लिहिलेले साहित्य जगण्याचे खरे तत्त्वज्ञान सांगत होते. मात्र अलीकडे साहित्यिकाची परिभाषा बदलत चालली आहे. सोशल मीडियाच्या अवास्तव वापरामुळे अनेक जण कॉपी-पेस्टच्या जमान्यात स्वतःला साहित्यिक समजू लागला आहे, हीच मोठी शोकांतिका असल्याचेही देसाई यांनी सांगितले.
संमेलनासाठी उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्या कवयित्री अंजली ढमाळ यांनीही यावेळी आपल्या मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, जे साधे व सहज असते, जे मनाला भावते, ते भावना रुपी लिहिले शब्द म्हणजे साहित्य होय. मात्र अलीकडे चंगळवाद वाढला असल्यामुळे बऱ्याचदा लिहावे तर नेमके काय लिहावे? असा प्रश्न माझ्यासारख्या नवोदित व सर्व सामान्य कवयित्रीला पडतो, असेही त्यांनी सांगितले. यावेळी अनेक संदर्भीय साहित्याचा आढावा घेत कवयित्री ढमाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक मनोगतातून कवी अजय कांडर यांनी आजच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक चळवळीचा खरा आरसा उपस्थितांसमोर आणला. तसेच समाज आणि साहित्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून सामाजिक जीवन जगताना साहित्याशिवाय जगणे म्हणजे जगणे नसावे, असे सांगत त्यांनी अनेक ज्वलंत विषयांवर भाष्य केले.
यादरम्यान मान्यवरांच्या हस्ते ‘सारेच पुरुष नसतात बदनाम’ या काव्यसंग्रहाचेही प्रकाशन करण्यात आले. साहित्य संमेलनासाठी संत साहित्याचे गाढे अभ्यासक अॅड. देवदत्त परुळेकर, अॅड. संदीप निंबाळकर, कादंबरीकार प्रा. प्रवीण बांदेकर, कवी विठ्ठल कदम, अंकुश कदम, प्रा. डॉ. गणेश मर्गज, प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर, प्रा. संजीवनी पाटील, प्रा. सुभाष गोवेकर, अभिनेते नंदकुमार पाटील, डॉ. सोनल लेले, प्रा. डॉ. सोमनाथ कदम, प्रा. सुचिता गायकवाड-कदम, प्रा. श्वेतल परब, प्रा. प्रतिभा चव्हाण, प्रज्ञा मातोंडकर, महेश पेडणेकर, राजेंद्र कांबळे, विजय ठाकर, परमेश्वर सावळे, ऋतुजा सावंत – भोसले, स्नेहा कदम यांसह अनेक साहित्यिक व मान्यवर मंडळी उपस्थित होते. कार्याक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संतोष जोईल यांनी तर आभार प्रदर्शन मधुकर मातोंडकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. वैभव साटम, प्रा. प्रियदर्शनी पारकर – म्हाडगूत, प्रज्ञा मातोंडकर यांच्यासह समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या सहकाऱ्यांनी प्रयत्न केले.
‘सारेच पुरुष नसतात बदनाम’ या काव्यसंग्रहाचेही प्रकाशन
समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचा उपक्रम म्हणून प्रभा प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘सारेच पुरुष नसतात बदनाम’ या काव्यसंग्रहाचेही प्रकाशन यावेळी झाले. या संग्रहात मनीषा पाटील, सरिता पवार, प्रा. नीलम यादव-कांबळे , प्रा. प्रियदर्शनी पारकर, अॅड. मेघना सावंत, योगिता राजकर, शालिनी मोहळे, प्रमिता तांबे, प्रा. सुचिता गायकवाड, स्नेहा राणे, आर्या बागवे, मनीषा शिरटावले, रीना पाटील, अॅड. प्राजक्ता शिंदे, कल्पना बांदेकर, स्नेहा कदम, योगिता राजकर, मृणाल पिळणकर आणि अंजली ढमाळ आदींच्या प्रत्येकी चार कवितांचा समावेश करण्यात आला आहे.