वेंगुर्ले :
वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी गावातील हरिचरणगीरी तिठा येथे श्री गणेशमूर्ती कलाआकार केंद्रामध्ये “तालविश्व संगीत विद्यालयाचा” शुभारंभ भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, वायंगणी सरपंच सुमन कामत, खानोली सो.सा. चेअरमन प्रशांत खानोलकर, सावरेश्वर दशावतार नाट्य मंडळाचे प्रकाश आकेरकर, भाजपा सांस्कृतिक आघाडीचे शैलेश जामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
हरिचरणगीरी येथील युवा कलाकार अनंत मठकर यांच्या संकल्पनेतून व पखवाज मध्ये एम.ए.ची पदवी घेतलेले मनिष तांबोसकर यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त पखवाज वादन तसेच तबलावादन शिकवले जाणार आहे. तसेच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमानुसार परिक्षांचे मार्गदर्शन केले जाणार आहे.
संगीत कलेच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम या संगीत विद्यालयातून होते, हे अभिमानास्पद आहे. सध्याच्या आधुनिक युगात युवा पिढी व्यसनाधीन होत असताना संगिता सारख्या कले कडे युवा वर्ग आकृष्ट होत आहे, हे सुद्धा भुषणावह आहे. तसेच ही कला जोपासण्यासाठी अशा संगीत विद्यालयाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन उद्घाटन प्रसंगी प्रसंन्ना देसाई यांनी केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत अनंत मठकर यांनी केले . यावेळी सचिन नाईक, अमोल आकेरकर, शुभम करंगुटकर, दत्तात्रय मठकर इत्यादी उपस्थित होते.