ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे आवाहन.
वैभववाडी
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सिंधुदुर्ग मंडाळाअंतर्गत तालुकानिहाय विज ग्राहक मेळावे आयोजित करावेत अशी विनंतीवजा मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र -सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने अधीक्षक अभियंता, कुडाळ यांच्याकडे मेलद्वारे केली होती. त्यानुसार अधीक्षक अभियंता कुडाळ यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र- सिंधुदुर्ग जिल्हा शाखेला पत्र पाठवून विज ग्राहक मेळाव्यामध्ये सहभागी होऊन सहकार्य करण्यासंदर्भात कळविले आहे. दिनांक ११ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित केलेल्या वीज ग्राहक मेळाव्यामध्ये जिल्हा व्यापारी महासंघासोबत ग्राहक पंचायत महाराष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्हा शाखा आणि सर्व तालुका शाखा सक्रिय सहभागी होऊन विज ग्राहक मेळावे यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
विज ही सर्वांची प्राथमिक व मूलभूत गरज आहे.विजेचा वापर करणारा प्रत्येक नागरिक हा विज वितरण कंपनीचा विज ग्राहक आहे. जिल्ह्यातील विज ग्राहकांच्या विविध प्रकारच्या समस्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या जिल्हा व तालुका शाखेच्या माध्यमातून सोडविल्या जात आहेत.
काही अपवाद वगळता विज ग्राहकांच्या समस्या या नैसर्गिकपेक्षा मानवनिर्मित अधिक आहेत. विज ग्राहकांच्या समस्या समन्वयातून सोडवण्यासाठी व कंपनीच्या विविध योजना ग्राहकांपर्यंत पोचवणे हा या मेळाव्यांचा उद्देश आहे.
दिनांक ११ नोव्हेंबर रोजी वैभववाडी, दि.१४ रोजी ओरस, दि.१५ रोजी आचरा, दि.१६ रोजी सावंतवाडी, दि.१७ रोजी दोडामार्ग, दि.१८ रोजी वेंगुर्ला व दि.२४ रोजी देवगड येथे वीज ग्राहक मेळावे आयोजित केले आहेत. या विज ग्राहक मेळाव्याला त्या त्या तालुक्यातील व भागातील विज ग्राहकांनी आपल्या तक्रारी घेऊन स्वतः उपस्थित राहून तक्रारीचे निराकरण करून घ्यावे असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र-सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने केले आहे. ,