सावंतवाडी
सध्या शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. त्या समस्या अभ्यासपूर्ण रीतीने सोडविण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणाराच व्यक्ती अर्थात शिक्षकच आमदार असायला हवा. म्हणून आगामी निवडणुकीत शिक्षक परिषद प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. त्यासाठी आपण सध्या कोकण दौरा करीत असून अनेक शिक्षकांनी विद्यमान आमदारांबद्दल आणि त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल रोष व्यक्त केला, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष वेणुनाथ कडू यांनी केले.
यावेळी राजेंद्र माणगावकर, सलीम तकिलदार, एस. एम. सांगळे, वाय. पी. नाईक, एस. आर. मांगले, एन. पी. मानकर, विलास कासकर, भरत केसरकर, प्रवीण सानप, एस. पी. कुळकर्णी यांच्यासह राज्य शिक्षक परिषदेचे असंख्य शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बांधव उपस्थित होते.
कडू पुढे म्हणाले, गेल्या सहा वर्षात कोकण विभागातील पाचही जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे अनेकदा केवळ अभ्यासपूर्ण@१११1१ पाठपुरावा केला नसल्यामुळेच हे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या मूलभूत प्रश्नांची सुद्धा सोडवणूक होऊ शकली नाही. गेल्या सहा वर्षात विनाअनुदानितचे प्रश्न तसेच नियमित मान्यता व शालार्थ आयडी या समस्यांना सोडविण्यासाठी सामान्य शिक्षकांना अनेकदा आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आगामी काळात हे सर्व चित्र बदलण्यासाठी सज्ज आहे, असेही कडू यांनी सांगितले.