You are currently viewing तुझ्या आठवांचं गोंदण उरलंय”

तुझ्या आठवांचं गोंदण उरलंय”

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच…लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्य लेखक कवी सत्तू भांडेकर लिखीत अप्रतिम ललित लेख*

*अंत ओळ लेखन*

*”तुझ्या आठवांचं गोंदण उरलंय”*

*पहिलं प्रेम…*

आठवते का ग तुला..?
“तुझी माझी पहिलीच भेट
डोळ्यास डोळे भिडले थेट”

कळीनं उमलावं…उमलूनी फुलावं… फुलूनी बहरावं…अगदी तशीच बहरली होतीस तू अन् लावण्य तुझं…तारुण्याच्या उंबरठ्यावरील तू म्हणजे बघताच क्षणी मोहिनी पडावी अगदी अशीच माझीही अवस्था…मी चोरून बघितलेली एक एक तुझी हास्यलकेर म्हणजे कायम हृदयी दरवळणारं चालताबोलता स्वप्नच..आणि रमायचं बरं का हे मनही स्वप्नात तुझ्या…लपेटून घ्यायचं एकेक आठवणी आणि भिजायचा तुझ्याच आठवगंधात…बघ ना सजायची तूच…मात्र निरखून बघायचं मी…लाजायची तू…गुदगुल्या व्हायच्या मला..हसायची तू…आधार पाकळ्या खुळायच्या माझ्या…हा प्रीतगंधच नव्हता का मग..? पण तुलाही कधी कळलाच नाही…उमगला ग मला…आणि समजलाही..पण कुठं होती एवढी तेव्हा हिम्मत माझ्यात…पण आजही डोळ्यांच्या पापण्या पालवून शांत पहुडावं म्हटलं तरी कैद झालेल्या आठवणी दरवळतातच बरं का..तुझाच कस्तुरी गंध बनून..बंद करावं म्हणतो ग मी माझ्याच हृदयाचे जुनाट कप्पे..पण आठवांचे ते रंगच कसले..? न सजताच पुसले जातील…न भावताच मिटले जातील..?

आजही जावं म्हणतो त्या जुन्याच वाटांनी…पण असेल का त्यांवर तो जुनाच दरवळ..का असतील त्या वाटा उदासलेल्या तुही येत नाही म्हणून..तेव्हा गजबजलेली वळणेही असतील का आजही गजबजलेली..तुझी चाहूल लागताच असायची ना तिथंही वर्दळ…आज जमलीय ग गर्दी…जुन्याच वाटेत नव्या आठवांची..तेव्हा मनातच विरलेल्या अफाट भावनांची…कोंडून कोंडून गुदमरलेल्या असंख्य श्वासांची…आता घ्यावं म्हणतोय श्वास नव्याने…तरीही गुदमरतातच श्वास..बघ ना आजही बघतो मी तीच ती…तेंव्हाचीच…गर्दी रानफुलांची..पण दरवळते कुठं ग गंध…जिथं पसरले असतील सावट उदासीचे…तिथं टिपता येईल का सौंदर्याचे नवीन दृश्य..?

बघ ना आज धो धो कोसळणाऱ्या पावसात चिंब भिजूनही काहीसं कोरडाच असल्याचा भास…कधी कधी एक छत्री सामावून घ्यायचीच ना तुला आणि मलाही…मी घ्यावं म्हणतो आजही तीच छत्री पावसात हाती..पण आज सांभाळेनाशीच झालीय तीही..तिलाही नकोच असेल एकटाच मी..पाऊसही तोच आणि मातीही तीच…पण कुठं हरवला आज मृदगंध कुणास ठाऊक..आधी बघ ना भिजायची तू…मात्र वाटायचं मला…भिजवतो की काय मीच..खरंतर तुला आवडायचं भिजायला आणि मलाही भिजवायला…आज तू नाहीस म्हणूनच होत असेल बहुदा मलाही चिंब भिजण्याचा भास..पण काय अर्थ नसतेच ग तुझा हवाहवासा सहवास…

मी गोंदवला होता बघ ह्रदयावरती माझ्या..तुझ्याच नावाचं कधीही न मिटणारं गोंदण..म्हटलं देता येईल एक अनोखी भेट…पण बघ ना आजही ती भेटच आहे कधीही तुला न कळलेली..क्षणोक्षणी…मनोमनी खोल अंतरी रुळलेली..आज गाठावं म्हणतोय अथांग सागर पण लागेल का सांग ना थांग तुझा..तर कधी वाटते मग न कळताच कळलेलं विसरून सारं… गुंतली असशील विश्वात नव्या…बांधून नवे प्रीतबंध..उधळून नवे प्रीतगंध..आज बनतो म्हणतोय सोबती मीच माझा…उरले म्हणुनी तुझ्याच आठवांचे गोंदण…

सत्तू भांडेकर, गडचिरोली

 

प्रतिक्रिया व्यक्त करा