*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी सुभाष मंडले यांनी संवाद दिवाळी अंक २०२२ वर दिलेली बोलकी प्रतिक्रिया*
*📚’संवाद मिडिया’ – संवाद तुमचा-आमचा, उभ्या महाराष्ट्राचा.📚*
*दिपावली विशेषांक -२०२२*
‘संवाद मिडिया २०२२’ या दिवाळी अंकांची टॅग लाईन जरी ‘संवाद तुमचा-आमचा, उभ्या महाराष्ट्राचा’ अशी असली तरी त्याचे स्वरूप महाराष्ट्रापुरतेच मर्यादित न राहता देशात आणि परदेशात वास्तव्यास असलेल्या ‘मराठी मनांचा संवाद’ रसिक वाचकांच्या भावविश्वापर्यंत घडविण्याचे आहे.
हा साहित्य संवाद घडवून आणण्याचं महान कार्य साहित्य प्रेमी संपादक श्री राजेश नाईक व चतुरस्त्र लेखक, कवी, कार्यकारी संपादक श्री दिपक पटेकर व त्यांची टिम यांनी केले आहे. त्याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे.
अलिकडे वाचकांसाठी तळमळीने सरस साहित्यकृती निर्माण करणाऱ्या गुणी साहित्यिकांना व्यासपीठ मिळत नसल्याचे चित्र दिसत असल्यामुळे सच्चा लेखक आणि वाचकांच्यातला संवाद खुंटला जात असताना ‘संवाद मिडिया-२०२२’ या दिवाळी अंकामधून या संवादाचा छान सुवर्ण योग जुळवून आणत वाचकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या अतिशय दर्जेदार कथा, कविता, लेख, अनुभव कथन, अलक यांची एकापेक्षा एक सरस साहित्य मेजवानी दिली आहे.
अजून येतो गंध फुलांचा पुस्तकातूनी,
कातरवेळी तुला विसरणे सोपे नसते…या श्रीनिवास गडकरी यांच्या काळजाचा ठाव घेणाऱ्या रचनेप्रमानेच विजय जोशी, चंद्रशेखर धर्माधिकारी, कै. अरविंद ढवळीकर, विलास कुलकर्णी, अरुणा दुद्दलवार, माधुरी मगर-काकडे, बाबू फिलीप डिसोजा यांसारख्या एकूण २५ दिग्गज कवींनी आपली काव्य सुमने या दिवाळी अंकात सादर केली आहेत.
प्रा. मोहन काळे यांच्या कथेतील शिशिर ऋतूत फुललेला पळस हा खरोखरच रखमाच्या जीवनात आशेचा किरण दाखवणारा आहे. विजय फडणीस यांच्या ‘पुनर्भेट’ मध्ये कॉलेजमधील मैत्रीणीची अचानक, अनपेक्षित झालेली भेट, भेटीतील मोजकाच पण हळवा संवाद ‘अशी पाखरे येती आणिक…’ या गीताचे सुंदर सुर हृदयावर उमटवतात.
सौ. स्मिता रेखडे यांची आशा निराशेचा खेळ झटकत नवचैतन्याची पहाट उजळवणारी ‘मीच मला ओलांडते’ ही कथा कशी प्रेरक आहे हे वाचायला मिळते. श्री. दिपक पटेकर यांच्या ‘मनामनातला कृष्ण कन्हैय्या’ या ललीत लेखातील राधाच्या मनातील कृष्णाबद्दलचा प्रीत गंध आपल्याही मनात दरवळत राहतो.
डॉ. क्षमा शेलार यांच्या ‘निळाईत माझी भिजे पापणी..’ या प्रवास वर्णनातील थंड पाण्याचा सरोवर अक्षरशः डोळ्यासमोर उभा राहतो. अमेरिका स्थित असलेल्या राधिका भांडारकर यांच्या ‘याला जीवन ऐसे नाव’ लेखामधील अनुभव स्त्रीयांना नक्कीच परिस्थितीशी दोन हात करत पुढे सरकण्याचे बळ देईल. आई आणि मुलाचं (मुलगा/मुलगी) जे भावनिक नातं असतं ते वडील आणि मुलांच्यात कुठे दिसत नाही, असे मानले जाते. याचा अर्थ वडील आणि मुलं यांच्यात भावनानुबंध नसतो का? याचं उत्तर आपल्याला श्री सुभाष आ. मंडले यांनी अनुवादित केलेल्या ‘वडील विसरतात’ या लेखातून मिळेल व आपल्याला आपल्यातल्या बापाची नव्याने ओळख होईल.
लेखिका निशा दळवी यांचा ‘ नात्याची वीण’ हा लेख तसेच श्री. हरिश्चंद्र पाटील यांची ‘इस्कोट’ ही ग्रामीण कथा वाचनीय आहेत. अशा एकूण ३१ प्रतिभावंत साहित्यिकांच्या लेखनीतून साकारलेले साहित्य वाचकांचे भावविश्व समृद्ध करणारे आहे.
आतापर्यंत व्हॉट्स ॲप’च्या साहित्यिक ग्रुपमधून विशेषत: ‘साकव्य’ समुहाच्या माध्यमातून देश विदेशातील मराठी साहित्यिकांच्या रचना वाचायला, अनुभवायला तुरळक प्रमाणात मिळत होत्या, पण ‘संवाद मिडिया २०२२’ या दिवाळी अंकांच्या माध्यमातून या गुणी साहित्यिकांच्या माय मराठीच्या मातीतील सण, उत्सव, संकृती बद्दलच्या त्यांच्या भावना अनुभव वाचायला मिळाल्या.
संपादक श्री. राजेश नाईक आणि कार्यकारी संपादक श्री दिपक पटेकर यांनी ‘संवाद मिडिया’ च्या माध्यमातून दर्जेदार साहित्याला न्याय देण्यासाठी घेतलेली मेहनत खरोखरच कौतुकास्पद आहे.
‘संवाद मिडिया २०२२’ या दिवाळी अंकातील दर्जेदार साहित्य, साहित्य प्रेमींच्या मनात नक्कीच अढळ स्थान मिळवेल,यात काही शंका नाही.
📚 *’संवाद मिडिया २०२२’* 📚
दिवाळी अंक.
पृष्ठे-७२ , किंमत- १३०
संपादक- श्री राजेश नाईक
कार्यकारी संपादक- दिपक पटेकर
8446743196
✍️_सुभाष आ. मंडले
(९९२३१२४२५१)
विजय (आण्णा) पराडकर यांची प्रतिक्रिया….
नमस्कार सर…🙏🚩
*संवाद दिवाळी अंक* या अंकासाठी आपण दिलेली प्रतिक्रिया अगदी एखाद्या वाचकाला हा दिवाळी अंक घेऊन वाचावा अशी जिज्ञासा त्याच्या मनात उत्पन्न होईल इतकी बोलकी आहे.
प्रत्येक कविता, कथा आणि लेख यांचा उल्लेख करून त्या त्या लेखणीचा गौरव आपण आपल्या लेखन कौशल्याने केलेला आहे.
अंकाची रूपरेखा आणि त्यात असलेल्या वाचन साधनेची खूप सुंदर मांडणी आपण केली आहे.
आपण एका उत्कृष्ट अंकाची माहिती आमच्यापर्यंत पोहचवली त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद…!!🙏🚩
*🚩जय शिवराय🚩*