सावंतवाडी :
गोव्या प्रमाणे सिंधुदूर्गचा विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी पर्यटन जिल्हा डोळ्यासमोर ठेवून खासबाब म्हणून कोकण कीनारपट्टीवर कळीचा मुद्दा ठरणारा “सीआरझेड” वगळता येवू शकतो का कींवा त्यात शिथिलता आणू शकतो का याबाबत मुंबईत बैठक घेवून केंद्राकडे पाठपुरावा करेन, असा विश्वास आज येथे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केला. दरम्यान हा निर्णय झाल्यास त्याचा फायदा अखंड सिंधुदूर्ग किनारपट्टीला होणार आहे. या ठिकाणचे पर्यटन वाढण्यास मदत होणार आहे. त्यासाठी लवकरच पर्यटनमंत्र्यांना या ठिकाणी आणून वस्तूस्थिती दाखवून देवू आणि सत्कारात्मक निर्णय घेवू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
श्री. नार्वेकर हे आज वेंगुर्ले मातोंड येथील कुलदेवतेचा जत्रोत्सवासाठी सावंतवाडीतील निवासस्थानी विधानसभा अध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या आणि पर्यायाने सावंतवाडी वेंगुर्ल्याच्या विकासासाठी आपण प्रयत्न करणार आहे, असे सांगितले. यावेळी पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, विभागीय पोलिस अधिकारी डॉ. रोहीणी सोळंके, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, मुख्याधिकारी जयंत जावडेकर आदी उपस्थित होते.
या ठिकाणी गोव्याच्या तुलनेत सिंधुदूर्गचा विकास करू, असे त्यांनी म्हटले. हाच धागा पकडुन या ठिकाणी सीआरझेडचा मुद्दा अडचणीचा ठरत आहे. त्यामुळे गोव्यासारखे समुद्र किनारी पर्यटन होत नाही. याकडे त्याचे लक्ष वेधण्यात आले. मात्र केंद्राकडुन सीआरझेड बाबत निर्णय होतो. मुंबई वगळता कोकणपटट्यांच्या अन्य झोन मध्ये समावेश केला आहे, असे यावेळी नार्वेकर यांनी सांगितले. मात्र सिंधुदूर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषीत करण्यात आला आहे. त्यामुळे विशेष बाब म्हणून लक्ष घालण्यात यावे, अशी मागणी यावेळी उपस्थित पत्रकारांच्या माध्यमातून करण्यात आली.
पत्रकारांनी मांडलेली संकल्पना त्यांना आवडली. त्यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रीया दिली. आपण मांडलेली भूमिका महत्वाची आहे. विशेष बाब म्हणून याठीकाणी सीआरझेडच्या कायद्यात शिथीलता आणता येवू शकते. मात्र त्यासाठी आपण सर्वानी मिळून प्रयत्न करूया, त्यासाठी पर्यटनमंत्र्याना याठिकाणी जानेवारीत आपण आणून पुढील आराखडा तयार करू, आणि याबाबत काही सकारात्मक निर्णय घेता येतो का ? यासाठी केद्रस्तरावर पाठपुरावा करू, असे नार्वेकर म्हणाले.