उपअभियंता शिवनिवार यांचा मार्गावर बॅनर लावून केला निषेध…
वैभववाडी
करूळ घाट रस्त्याच्या दुरावस्थेला जबाबदार असणाऱ्या उपअभियंता अतुल शिवनिवार यांच्या निषेधाचे बॅनर महामार्गावर ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. वैभववाडीतील नागरिकांनी त्यांचा निषेध करत त्यांच्याविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे.
तरेळे-वैभववाडी या महामार्गाच्या दुरावस्थेकडे वारंवार लक्ष वेधूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहेत.या महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. हा राष्ट्रीय महामार्ग की ग्रामीण मार्ग असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहनचालक व प्रवाशांना जीव मूठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. तर ऊसाचा गळीत हंगाम सुरु होऊनही रस्त्यामुळे कोकणातील ऊस तोडणीला विलंब होत आहे. त्याचबरोबर मालवाहातूकीवरही याचा परिणाम होत आहे. याबाबत राजकीय पक्ष, शेतकरी व नागरीकांकडून रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली जात आहे.
मात्र याकडे महामार्ग प्राधिकरणाकडून दुर्लक्ष होत असून कामाच्या दर्जाही निकृष्ट होत असल्यामुळे या राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झाली आहे. याला कंटाळून संतप्त नागरीकांनी याला सर्वस्वी उपअभियंता अतुल शिवनिवार यांना जबाबदार धरुन त्यांच्या निषेधाचे बॕनर ठिकठिकाणी लावले आहेत. वैभववाडी रेल्वे फाटक बाजारपेठ व करुळ घाटात हे बॕनर लावले असून या बॕनरवर शिवनिवार यांचा फोटो छापण्यात आला आहे. पर्यटकानो, शेतकऱ्यांनो, व्यवसायीकांनो उपअभियंता यांचा जाहीर निषेध करा. खाली त्यांचा मोबाईल नंबरही दिला आहे.