You are currently viewing पोलीसांनी चांगली सेवा, कर्तव्य करुन जनतेच्या मनातील स्थान कायम ठेवावे

पोलीसांनी चांगली सेवा, कर्तव्य करुन जनतेच्या मनातील स्थान कायम ठेवावे

– पालकमंत्री रवींद्र चव्हाण

सिंधुदुर्गनगरी

पोलिसांच्या खाकी वर्दीची ताकद फार मोठी आहे. वर्दीधारी पोलीसांना पाहून सर्वसामान्य जनतेच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होते. आपल्या सेवाकाळात पोलिसांनी चांगली  सेवाकर्तव्ये करुन जनतेच्या मनातील स्थान कायम ठेवावेअशी भावना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली.

          पोलीस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात पालकमंत्र्यांनी सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. सुरुवातीला पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी रोप देवून पालकमंत्र्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी संगणकीय सादरीकरण करुन पोलीस दल कामकाजाविषयी सविस्तर माहिती दिली.

          पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, पोलिसांना दिलेल्या अधिकाराचा योग्य वापर महत्त्वाचा आहे. निसर्गसंपन्न जिल्ह्यातील जनतेला शांततेचं जीवन अपेक्षित आहे. त्याला साजेसं वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिसांचं योगदान महत्त्वाचे आहे.

           तरुणाईला व्यसनापासून रोखण्यासाठी विशेषतः अंमली पदार्थापासून रोखण्यासाठी परिवर्तनाचे काम करा. चुकीच्या मार्गावर जाणाऱ्या पिढीला वाचवण्यासाठी वडीलधाऱ्या अधिकाराचा वापर करा. नियमबाह्य गोष्टींवर वेळीच नियंत्रण ठेवा.

           निवृत्तीच्यावेळी निरोप समारंभात आपले कुटुंबीय असतात. त्यांच्यासमोर गौरव होत असतो. सेवाकाळात अशी कर्तव्ये आपल्या सर्वांनी केलेली असावीतज्याचा उल्लेख निरोप समारंभातील गौरव भाषणात वक्त्यांनी केला पाहिजे. त्यासाठी शुभेच्छा. पोलीस विभागाच्या सर्व अडचणी सोडवल्या जातील. प्रलंबित कामे मार्गी लावली जातीलअशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा