सिंधुदुर्ग :
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा नाम.उदय सामंत यांचे बंधू उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत हे येत्या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना व भाजपा युतीचे लोकसभा उमेदवार असतील अशी शक्यता वाटत आहे. माजी पालकमंत्री नाम.उदय सामंत यांनी अडीज वर्षे पालकमंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीत परिस्थितीचा पुरेपूर अभ्यास केला आहे, त्याचबरोबर सामंत कुटुंबीय मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथीलच आहेत, त्यामुळे जिल्ह्याची संपूर्ण माहिती सामंत बंधूंना आहेच. किरण उर्फ भैय्या सामंत हे येत्या ८/९ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने भविष्यातील लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारी करत असल्याची माहिती समोर येत आहे.
किरण सामंत यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात बाळासाहेबांची शिवसेना पक्षात अनेक पक्षप्रवेश होणार आहेत त्याचबरोबर त्यांच्या उपस्थितीत मालवण येथील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन देखील होणार आहे. उद्योजक किरण सामंत यांच्या दौऱ्यानिमित्त नियोजन बैठक आज मालवण येथे पार पडली. या बैठकीसाठी किसन मांजरेकर, बबन शिंदे, भूषण परुळेकर, दामू सावंत, महेश राणे, विश्वास गावकर, अरुण तोडणकर, पराग खोत, उल्हास तांडेल, बाबू नाटेकर, राजा तोंडवळकर, ऋत्विक सामंत, अश्विन हळदणकर, दीपक मिठबावकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेना पक्षातून विनायक राऊत हे मागील दोन लोकसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने निवडून आले आहेत. परंतु विनायक राऊत यांच्या विजयात सर्वाधिक वाटा जर कोणाचा असेल तर तो केवळ शिवसेनेचा नसून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नाम.दीपक केसरकर आणि रत्नागिरी जिल्ह्यातून नाम.उदय सामंत यांचा आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीचे उमेदवार जर किरण सामंत राहिले तर खास.विनायक राऊत यांच्यासाठी ती डोकेदुखी ठरणार आहे. परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला तर भाजपावासी झालेले नारायण राणे यांचे पारडे तळ कोकणात चांगलेच जड आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक स्वायत्त संस्था कित्येक वर्षे त्यांच्या अधिपत्याखाली आहेत. माजी खासदार असलेले निलेश राणे हे भाजपाचे नेते असल्याने त्यांची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे. किरण सामंत यांना नारायण राणे पाठिंबा देतात की काय करतात यावर देखील सामंत यांच्या विजयाचे गणित बसणार आहे.
मूळचे सिंधुदुर्ग वासीय असलेले उद्योजक किरण सामंत यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकसभेसाठी मोर्चेबांधणी करायची असेल तर सिंधुदुर्ग वासीयांना विकासात्मक कामांचा विश्वास देण्याबरोबरच, नवीन पक्ष असलेल्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची बांधणी, पदाधिकारी निवड इत्यादी बरोबरच केंद्रीयमंत्री नारायण राणे पितापुत्र यांच्या आशीर्वादाची देखील आवश्यकता भासणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा आजपर्यंत शिवसेनेच्या पाठीशी राहिला किंबहुना सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघ देखील शिवसेनेच्या पाठीशी राहिला आहे, परंतु बदलत्या राजकीय परिस्थितीत मतदार देखील संभ्रमात आहेत आणि याचा फायदा नक्की कोणाला होणार हे सांगणे आजच्या घडीला फार घाईचे होणार हे मात्र नक्की…!
एकंदरीत शिवसेना पक्ष फुटून सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने वाटचाल करत असलेल्या परंतु शिवसेनेचे सत्तेतील शिलेदार हातात असलेल्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला भाजपाच्या मदतीने लोकसभा निवडणुकीचे धनुष्य पेलणे नक्कीच शक्य होईल…त्यासाठी केवळ तळागाळापर्यंत बाळासाहेबांची शिवसेना पोचविणे आवश्यक आहे.