You are currently viewing पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेकरिता आवाहन

पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेकरिता आवाहन

कणकवली ( प्रतिनिधी): कोविड-१९ मुळे आर्थिक संकटात सापडलेल्या नगर पथविक्रेत्यांकरिता केंद्र शासनाने “पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी” अशी विशेष सुक्ष्म पतपुरवठा योजना सुरू केली आहे.
कणकवली शहरातील पथविक्रेत्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन इच्छुकांनी त्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे व मुख्याधिकारी यांनी केले आहे.

नगरपथविक्रेते हे अनौपचारिकरीत्या नागरी अर्थव्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहेत. कमी भांडवलावर, रस्त्यांवर विविध वस्तूंची विक्री करणाऱ्या या पथविक्रेत्यांवर सध्या कोरोनामुळे आर्थिक दृष्ट्या फार परिणाम झाला आहे. त्यामुळे त्यांना आपले व्यवसाय परत सुरु करण्याकरिता भांडवलाची आवश्यकता असल्याचे लक्षात घेऊनच केंद्र सरकारने या योजनेची राज्यात अंमलबजावणी सुरू केली आहे.

या योजनेनुसार १० हजार रुपये एवढे खेळते भांडवल कर्ज स्वरूपात एक वर्षाच्या मुदतीवर बँकेकडून उपलब्ध होते. तसेच दर महिन्याला हे कर्ज नियमित परतफेड केल्यास त्यावर ७ टक्के व्याज अनुदान असून हा लाभ वर्षातून चार वेळा दर ३ महिन्यानुसार असा देण्यात येणार आहे. २४ मार्च २०२० व त्यापूर्वी शहरांमध्ये पथविक्री करत असलेल्या व शासनाच्या निकषास पात्र असलेल्या सर्व पथक विक्रेत्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. त्यासाठी विक्रेत्यांनी नगरपंचायत शिफारसपत्र व खेळते भांडवल कर्ज यासाठी आपले अर्ज हे महा-ई-सेवा किंवा आपले सरकार केंद्र यांवरून ऑनलाईन करावयाचे आहेत, असे नलावडे यांनी म्हटले आहे.
सदर योजनेमध्ये डिजिटल व्यवहारास प्रोत्साहन देण्यासाठी डिजिटल माध्यमातून व्यवहार करणाऱ्या विक्रेत्यांना ‘कॅशबॅक’ ची सुविधा त्यांच्या बचत खात्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा