बांव गावातील मुलीने सैन्य दलातील लेफ्टनंट पदापर्यंत मजल मारल्याने ग्रामस्थांनी लेफ्टनंट दिपाली गावकर हिचे केले जल्लोष स्वागत
कुडाळ
लहान असल्यापासून शेतीमध्ये काम करण्याची आणि शेतीत राबण्याची सवय होती. शेतीत काम केल्याचा फायदा मला सैनिकी प्रशिक्षणामध्ये झाला आणि मला तो अभिमान आहे. जेव्हा मी प्रशिक्षणामध्ये कुशलपणे एखादी कृती करायची तेव्हा प्रशिक्षण देणारे अधिकारी, माझे सहकारी सुद्धा माझे कौतुक करत असत. त्यावेळी मी सांगायचे की,मला अभिमान आहे मी शेतकऱ्याची मुली असल्याचा असे सैन्य दलातील लेफ्टनंट दिपाली गावकर यांनी सांगितले. एका शेतकरी कुटुंबातील सैन्य दलातील अधिकारी पदापर्यंत मजल मारणारी कुडाळ तालुक्यातील बांव गावातील लेफ्टनंट दिपाली गावकर ही सध्या आपल्या गावी आली आहे. तिच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे. बांव गावातील ग्रामस्थांनी लेफ्टनंट दिपाली गावकर हिची स्वागत रॅली काढली.
आपल्या गावातील एका मुलीने सैन्य दलातील लेफ्टनंट या पदापर्यंत भरारी घेतली त्याचा अभिमान गावातील प्रत्येकाला झाला. आणि बांव गावातील ग्रामस्थांनी लेफ्टनंट दिपाली गावकर या कुडाळ येथे रेल्वेने आल्यानंतर तिचे स्वागत रेल्वे स्थानक येथे केले. तसेच तिच्या बांव गावातील घरापर्यंत ग्रामस्थांनी रॅली काढली. ठिकठिकाणी स्वागत आणि अभिनंदन करण्यात आले या ग्रामस्थांच्या स्वागताने लेफ्टनंट दिपाली गावकर भारावून गेल्या. दरम्यान लेफ्टनंट दिपाली गावकर यांच्याशी बातचीत केली असता तिने सांगितले की, दहावीपर्यंतचे शिक्षण बांव गावातील हायस्कूलमध्ये घेतले त्यानंतर ज्युनिअर कॉलेज आणि पदवीपर्यंत शिक्षण कुडाळ ज्युनियर कॉलेज व संत राऊळ महाराज महाविद्यालयात घेतले बीएससी आयटी केल्यानंतर सैन्य दलात गेलं पाहिजे असे ठरविले मुळात आम्ही शेतकरी कुटुंबातील पण सैन्यांच्या वर्दीचे नेहमीच आकर्षण राहिले आहे. मी स्वतः महाराष्ट्र कॅडेट कोर्स तसेच माझा भाऊ नॅशनल कॅडेट कोर्समध्ये असल्यामुळे त्या वर्दीचे आकर्षण पहिल्यापासून. सैन्य दलात जाण्याचे जेव्हा ठरवले त्यावेळी त्यासाठी असलेल्या परीक्षा मी दिल्या नोकरी करत असताना या परीक्षा दिल्या या भरतीसाठी पदवीतर शिक्षणाची आवश्यकता होती ते सुद्धा मी मुंबई येथे पूर्ण केले आणि सैन्य दलाची परीक्षा उत्तीर्ण झाले.
सैन्य प्रशिक्षण हे कठीण असते सर्वांनाच माहित आहे पण लहान असल्यापासून आम्ही शेतीत राबल्यामुळे हे प्रशिक्षण घेत असताना तणाव आला नाही उलट इतर अधिकारी आणि माझे सहकारी हे तू सहज कसं का करतेस असं विचारायचे तेव्हा मी कॉलरला हात लावून मी शेतकऱ्याची मुली आहे. असे सांगायची आणि शेतकरी असल्याचा आम्हाला अभिमान आहे माझ्या आई-वडिलांनी मला नेहमीच पाठिंबा दिला आहे त्यामुळे मी सैन्य दलात जाऊ शकले सैन्य दलामध्ये हरियाणा, पंजाब या भागातील मुली मोठ्या प्रमाणावर असतात महाराष्ट्रीयन मुली त्यामानाने खूप कमी असतात असे सांगून माझे ध्येय निश्चित होते त्याच्यात यश येवो की अपयश येवो तरी प्रयत्न करत राहणे हे मी ठरविले होते असेही लेफ्टनंट दिपाली गावकर यांनी सांगितले. लेफ्टनंट दिपाली गावकर हिने सैन्याचे प्रशिक्षण चेन्नई येथे घेतले तर सध्या ती मणिपूरला कार्यरत आहे.