*जुगाऱ्यांना ने-आण करण्यासाठी इनोव्हा गाडी तैनात*
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षक पदी नवे अधिकारी दाखल झाले आणि अवैध धंदे बंद होतील अशा जिल्हावासीयांच्या आशा पल्लवित झाल्या. असे असतानाच कणकवली तालुक्यातील (वा)केडी गावातील एका बंद घरात जिल्ह्यातील जुगाराचे बादशहा म्हणून ओळख असणारे टिंगेल मेंथरो, दात पडक्या आप्पा, आणि मोरजेचा ड्राइवर यांची पार्टनरशिप मध्ये जोरदार जुगाराची बैठक सुरू आहे.
(वा)केडी येथील बंद घरातील बैठकीसाठी कोल्हापूर, रत्नागिरी, गोवा येथूनही जुगारी दाखल होत आहेत. अनेक ठिकाणाहून येणाऱ्या जुगाराच्या खेळींना ने-आण करण्यासाठी हायफाय इनोव्हा गाडीची सोय केलेली आहे. (वा)केडी येथील जुगाराच्या बैठकीमध्ये बाजारपेठेत दृष्टीसही न पडणाऱ्या २००० च्या नोटांचा पाऊस पडत आहे. त्यामुळे जुगाराच्या बैठकीमधून लाखोंची उलाढाल होत आहे. खाकी वर्दीतील कोणाच्या आशीर्वादावर कणकवली तालुक्यातील (वा)केडी येथे ही बैठक सुरू आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पो.अ. राजेंद्र दाभाडे यांची बदली होऊन त्यांच्या जागी नवे पोलीस अधीक्षक म्हणून श्री.अग्रवाल यांनी पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील संवेदनशील म्हटले जाणाऱ्या कणकवली पोलीस स्टेशनला पहिली भेट देत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सूचना दिल्या होत्या. परंतु त्यानंतर पोलीस अधीक्षक गुरुवार पर्यंत रजेवर असल्याचे समजते, त्यामुळे कणकवली तालुक्यातील (वा)केडी येथे बंद घरात सुरू असलेली बैठक कोणाच्या आशीर्वादावर? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्याला नवे पोलीस अधीक्षक लाभल्याने जिल्ह्यातील अवैध धंदे बंद होणार का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.