वैभववाडी तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा इशारा…
वैभववाडी प्रतिनिधी
वैभववाडी तालुक्यातील अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पाची निविदा क्रमांक ३ ची प्रक्रिया नुकतीच राबविली गेली आहे. या प्रक्रियेत घोळ झाला असून आम्ही याबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे लक्ष वेधले आहे. पाटबंधारे विभागाने हि प्रक्रिया रद्द करावी अशी आमची मागणी आहे. या प्रक्रियेतून कामे मॅनेज केली गेली असून हि प्रक्रिया नव्याने राबविली गेली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करेल आणि या प्रकल्पाचे काम करू देणार नाही. असा इशारा वैभववाडी तालुक्याचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिला आहे.
यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण पुढे म्हणले, कि वैभववाडी तालुक्यात अरुण माध्यम पाटबंधारे प्रकल्पाचे काम सुरु असून मुळातच या कामात अनियमितता झालेली आहे. त्यामुळे आधीच या प्रकल्पाच्या कामाबाबत स्थानिक लोकांमध्ये नाराजी आहे. त्यात या प्रकल्पाच्या निविदा क्रमांक ३ ची प्रक्रिया राबविली गेली आहे. हि प्रक्रिया राबवताना ठेकेदार आणि अधिकारी यांच्या संगनमताने राबविली गेली आहे. यातील निविदा खुल्या पद्धतीने झालेली नाही. यात ठराविक ठेकेदारांना काम देण्यात आले आहे. असा आरोपही रवींद्र चव्हाण यांनी केला आहे.
विशेष म्हणजे या प्रक्रियेत लोकप्रतिनिधींची भूमिकाही संशयास्पद आहे. त्यामुळे हि प्रक्रिया नव्याने राबविली जावी अशी आमची मागणी आहे. असे चव्हाण म्हणाले आहेत. तर अधिकाऱ्यांकडून जिल्ह्याबाहेरील ठेकेदारांना दमदाटी करण्यात आली असून त्यांच्याकडून सदर निविदा प्रक्रियेतील आपला सहभाग मागे घेत असल्याची पत्रे घेतली आहेत. याबाबत आम्ही मिरज येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास हि बाब आणून दिली आहे. या संदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले असून आम्हाला मुंबई येथे बोलावून घेतले आहे. तरी पाटील यांच्याकडे तक्रार गेल्यानंतर अधिकाऱ्यांनी आपल्या कारवाया गतिमान केल्या आहेत. तरी हि प्रक्रिया रद्द करून नव्याने राबविली गेली नाही तर राष्ट्रवादी आंदोलन करणार असून ठेकेदारांना काम करू देणार नाही असा इशारा रवींद्र चव्हाण यांनी दिला आहे.