जिल्ह्यातील प्रत्येक घरात किमान एक सरकारी अधिकारी घडवणे हे युनिक कणकवली चे ध्येय्य – सचिन कोर्लेकर
कणकवली
केवळ दहावी- बारावी मध्ये एक नंबर नको तर बारावी नंतर तीन वर्ष तयारी करून पहिल्याच प्रयत्नात अधिकारी होण्यासाठी प्रयत्न असायला हवेत. एमपीएससी युपीएससी सारख्या परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्हा नेहमी मागे असतो याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही तर त्यासाठी समाजातील सर्वच घटकांनी एकत्रित प्रयत्न करायला हवेत, तेंव्हाच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास अपेक्षित आहे यासाठीच जिल्ह्यातील प्रत्येक घरात किमान एक सरकारी अधिकारी होणे गरजेचे आहे हेच युनिक अकॅडमी ध्येय्य आहे असा विश्वास युनिक अकॅडमी कणकवली चे संचालक सचिन कोर्लेकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना व्यक्त केला.
‘साद फाउंडेशन सिंधुदुर्ग’ आयोजित, युनिक अकॅडमी कणकवली च्या ‘यशवंतांचा स्नेहमेळावा आणि दीपोत्सव’ कार्यक्रम फ्लोरेट कॉलेज, कणकवली येथे उत्साहात नुकताच संपन्न झाला.
यावेळी, प्रमुख मार्गदर्शक राजेंद्र इंगळे द युनिक पनवेल,चैतन्य क्लासेसचे प्रमुख अच्युत देसाई, खारेपाटण ग्रामविकास अधिकारी आर जी वेंगुर्लेकर, समता कोर्लेकर, युनिक अकॅडमी कणकवली चे संचालक सचिन कोर्लेकर, साद फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि कुडाळ नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी गितांजली नाईक, सिंधुदुर्ग लेखा परीक्षा लिपिक महेश चव्हाण, मंत्रालय संसदीय क्लर्क स्वप्नाली सावंत, रत्नागिरी तलाठी व प्रा, रमाकांत पांचाळ , मालवण -हडी तलाठी प्रितम भोगटे असे युनिक चे यशवंत व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शक मा.इंगळे सर यांनी स्पर्धा परीक्षा पद्धती आणि त्याकडे बघण्याचा दृष्टिकोण यावर मार्गदर्शन करताना सांगितले की कोणतीही परीक्षा कठीण नसते त्यामध्ये सातत्य ठेवल्यास यश नक्की मिळते. कोकणात युनिक अकॅडमी च्या माध्यमातून सर्व यंत्रणा आज उपलब्ध आहे आम्ही मुंबई पुण्यातून मार्गदर्शनासाठी येत असतो त्याचा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना फायदा करून घ्यायला हवा.
प्रशासकीय अधिकारी आणि साद फाउंडेशन च्या अध्यक्षा गितांजली नाईक प्रास्तवीक आणि यशवंताचे मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, जिल्ह्यातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्यासाठी साद फाउंडेशन ची साथ असणार आहे.खडतर प्रवास आणि नकारात्मक स्वभाव असणारे जवळचे नातेवाईक मित्र मैत्रींनी यांच्या पासून दूर राहून पोस्ट मिळेपर्यंत संयम ठेवता यायला हवा. प्रशासनाचा ताण सांभाळत पोस्ट मिळाल्यावर खूप समाधान वाटत. जिल्ह्यातील पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेकडे सकारात्मकतेने पाहायला हवे. मंत्रालयात काम करत असलेल्या स्वप्नाली सावंत म्हणाल्या की यश मिळत नाही तो पर्यंत खूप त्रास असतो. अभ्यासातल्या छोटया छोटया गोष्टी राहून जात असतात त्या पूर्ण करत राहिल्यास यश नक्की मिळून जाते. ग्रामीण भागात राहणारी मी आज मंत्रालय च्या संसदीय कामकाज विभागात काम करते ही माझ्यासाठी अनपेक्षित घटना आहे.कमी वयात मी आज इथ पर्यंत पोहोचू शकले ते स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासातूनच. रत्नागिरी तलाठी त्यानंतर जुनिअर कॉलेज प्राध्यापक व त्यातून एमपीएससी अभ्यास असा प्रवास असणारे रमाकांत पांचाळ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, यशस्वी होण्यासाठी आपल लक्ष निर्धारित करायला हवे आणि त्यासाठी लागणारी समतोल मानसिक अवस्था , जिद्द ,चिकाटी,तळमळ असेल तर आपल्याला यशापासून कोणी ही रोखू शकत नाही. मालवण-हडी येथे तलाठी असलेल्या प्रितम भोगटे म्हणल्या की, कोकणातील मुलांनी पहिल्यांदा एखादा क्लास केल्यानंतरच सेल्फ स्टडी केला पाहीजे. मला तलाठी व्हायचे हे स्वप्न होते क्लास न करता दोन तीन वेळा प्रयत्न करून ही तलाठी होता आले नाही. जेंव्हा क्लास लावला त्यामध्ये व्यवस्थित अभ्यास करून घेतल्यावरच 2019 मध्ये सिंधुदुर्ग च्या दोनच ओबीसी जागा असताना तलाठी झाले. तलाठी झाल्यावर कळले की एमपीएससी चा अभ्यास केला असता तर आज क्लासवन पोस्ट साठी तयारी झाली असती. विद्यार्थ्यांनी तयारी करताना किमान एमपीएससी क्लासवन ची तयारी करावी इतर सर्व पोस्ट ची तयारी आपसूकच होते. लेखापरीक्षा लिपिक सिंधुदुर्ग चे महेश चव्हाण म्हणाले की, पूर्वी सिंधुदुर्गात आवश्यक अशी एमपीएससी ची तयारी होणारी यंत्रणा नव्हती त्यामुळे खूप विद्यार्थी यापासून वंचित होते आम्ही पण सुरुवातीला तयारीसाठी पुण्यात जाऊन आलो त्यानंतर 2017-18 युनिक अकॅडमी कणकवलीत सुरु झाल्याने आम्हांला तयारी करायला सोपे गेले. स्वतःच्या घरी राहून तयारी करता आली आज युनिक अकॅडमी कणकवली कायम या ठिकाणी आहे याचा निश्चित फायदा इथल्या विद्यार्थ्यांना होईल. त्यासाठी युनिक कणकवली आणि साद फाउंडेशन सिंधुदुर्ग यांना लागणारी मदत आमच्याकडून केली जाईल असा विश्वास सर्व यशवंताच्या वतीने व्यक्त केला.