कणकवली
कणकवली नगरपंचायत च्या वतीने नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून सलग दुसऱ्या वर्षी कणकवली शहरात दिवाळी बाजार भरविण्यात आला.१९ ते २३ ऑक्टोबर या पाच दिवस चाललेल्या या दिवाळी बाजारात सुमारे १० लाख रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. बचत गटांच्या माध्यमातून बनविण्यात आलेले घरगुती खाद्यपदार्थ तर शेवटच्या दोन दिवसात अपुरे पडू लागले. गेल्या दोन वर्षाच्या कोविड कालावधीनंतर यावर्षी या दिवाळी बाजाराला उद्घाटनानंतर तुडुंब गर्दी झाली. थेट उत्पादक ते ग्राहक या संकल्पनेला अनेकांनी चांगला प्रतिसाद देत त्याचा फायदा उत्पादकांना झाला.
माती कला व्यवसायिक व कुंभार समाज बांधव यांनी बनवलेल्या घरगुती मातीच्या वस्तू आकाश कंदील यासह अनेक वस्तूंना या दिवाळी बाजारात ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिल. तर बुरुड व्यावसायिकांनी देखील अत्यंत आकर्षक असे बनवलेले बांबू पासूनचे आकाश कंदील हे देखील अनेकांच्या पसंतीस उतरले. दिवाळी करिता अनेकदा फराळ घरगुती पद्धतीने बनवलेला असला तर तो खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर असतो. व ही बाब हेरून कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी या संपूर्ण दिवाळी बाजारात घरगुती वस्तूंचा समावेश करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. व याचा फायदा होत बचत गटांनी बनवलेले घरगुती खाद्यपदार्थ अक्षरशः शेवटच्या दोन दिवसात कमी पडू लागल्याची स्थिती होती.
गेल्या दोन वर्षाच्या कोविड काळानंतर यावर्षी दिवाळी बाजारात ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याने उत्पादित माल कमी पडू लागल्याची स्थिती निर्माण झाली होती असेही श्री नलावडे यांनी सांगितले. या दिवाळी बाजारात एकूण ३१ स्टॉल चा समावेश करण्यात आला होता. यातील ५ स्टॉल हे माती काम करणाऱ्या कुंभार समाज बांधवांचे होते. केवळ फराळ व मातीच्या वस्तू नाही तर घरगुती पद्धतीने बनवलेले आकाशकंदील व घरगुती अन्य वस्तूंना देखील या दिवाळी बाजारात मोठी मागणी होती. गेल्या दोन वर्षात नगरपंचायतने कणकवली शहरातील बचत गट व घरगुती वस्तू बनवणाऱ्या कुंभार समाज बांधवांना दिवाळीच्या निमित्ताने या दिवाळी बाजारच्या माध्यमातून एक बाजारपेठ उपलब्ध करून दिली. व गेली दोन वर्ष हा उपक्रम सातत्याने राबवल्यानंतर त्याला उत्तरोत्तर चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती श्री नलावडे यांनी दिली.