घरोघरी आरोग्यपथक देणार भेट; नागरिकांनी सहकार्य करण्याचे वैद्यकीय अधीक्षकांचे आवाहन
सावंतवाडी
शासनाच्या आरोग्य विभागाच्यावतीने ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे अभियान राबविण्यात येत आहे.सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्यावतीने २५ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत सावंतवाडी शहरात घरोघरी आरोग्य पथक भेट देत ज्या महिला लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी झाली नाही, त्यांची तपासणी केली जाणार आहे.
त्यामूळे नागरिकानी आरोग्य पथकाला सहकार्य करावे, असे आवाहन सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांनी केले आहे.
शासनाच्या आरोग्य विभागाच्यावतीने ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे महिला आरोग्य तपासणी अभियान गुरुवार ६ ते मंगळवार १८ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात आले होते. अठरा वर्षावरील महिलांचे वजन, उंची, हिमोग्लोबिन, ब्लड शुगर, बॉडी मास इंडेक्स आदी तपासण्या या अभियान अंतर्गत करण्यात आल्या. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या या अभियानाला महिलांचा चांगला प्रतिसाद लाभला. काही महिला लाभार्थी तपासणीपासून वंचित राहू नये, यासाठी उपजिल्हा रुग्णालयाच्यावतीने २५ ते ३० ऑक्टोबर या कालावधीसाठी सावंतवाडी शहरासाठी सकाळी ९ ते १ यावेळेत महिला आरोग्य विभागाची दोन पथके घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करणार आहेत. २५ रोजी खासकीलवाडा, २६ रोजी सालईवाडा, २७ रोजी सबनीसवाडा, २८ रोजी वैश्यवाडा, २९ रोजी झिरंगवाडी व ३० रोजी बाहेरचावाडा व भटवाडी या भागात महिलांची तपासणी केली जाणार आहे या अभियानाला सर्वानी सहकार्य करावे असे आवाहन डॉ दुर्भाटकर यांनी केले आहे.