१०० शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर केले उभे; प्रमोद रावराणे यांचे गौरोउद्गार
वैभववाडी
कृषी विभागात काम करत असताना खात्याची प्रतिमा उंचावण्याचे काम अधिकारी कै.विवेकानंद नाईक यांनी केले आहे. कर्तव्याच्या पलीकडे जाऊन जबाबदारीने काम नाईक यांनी केले. पैसे जिरवण्याचे कार्यालय अशी ओळख कृषी खात्याची होती. मात्र ती ओळख नाईक यांनी पुसून काढत जवळपास 100 शेतकरी स्वतःच्या पायावर नाईक यांनी उभे केले. त्यांचा आदर्श घेऊन इतर कर्मचाऱ्यांनी काम केले पाहिजे. आर्थिक उन्नतीसाठी शेतकऱ्यांनी संघटित व्हावे. हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल. असे प्रतिपादन वैभववाडी तालुका खरेदी-विक्री संघाचे व्हा. चेअरमन प्रमोद रावराणे यांनी केले.
वैभववाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे कै. विवेकानंद नाईक यांचा द्वितीय स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी तालुक्यातील प्रगतशील शेतकरी राजेश तावडे रा. नाधवडे यांना विवेकानंद नाईक वैभव कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रवण फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड वैभववाडी यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी सभापती बाप्पी मांजरेकर, खरेदी विक्री संघांचे चेअरमन महेश संसारे, आशालता नाईक, प्रगतशील शेतकरी विलास देसाई, विठोबा सावंत, रवींद्र पवार, मंगेश कदम, महेश रावराणे व शेतकरी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
आशालता नाईक म्हणाल्या, तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी नाईक तळमळीने काम करत होते. ऊन, पाऊस न पाहता ते शेतकऱ्यांसाठी वेळ देत होते. त्यांनी उभे केलेले शेतकरी आर्थिक सदन झाले पाहिजे. हीच खरी त्यांना श्रद्धांजली असेल. यावेळी बाप्पी मांजरेकर, विलास देसाई, महेश संसारे, मंगेश कदम यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार महेश रावराणे यांनी केले.