रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत कोणत्याही प्रकारचे वाद्य वापरण्यास सक्त मनाई
नियमांचे पालन न केल्यास कारवाई करणार : मालवणचे पोलीस निरीक्षक विजय यादव यांचा इशारा
मालवण :
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी नरकासुर बनवण्याची धावपळ सुरु असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये नरकासुर मिरवणुकांसाठी पोलिसांनी कडक नियमावली जारी केली आहे. रात्री १० ते पहाटे ६ पर्यंत कोणत्याही प्रकारचे वाद्य वाजवून मिरवणुका काढण्यास पोलिसांनी मनाई केली असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डीजेच्या वापराला पूर्णतः मनाई आहे. मंडळानी पारंपरिक वाद्यांचा वापर करून रात्री १० वाजेपर्यंत मिरवणूका काढाव्यात, असे आवाहन पोलीस निरीक्षक विजय यादव यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी १८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर पर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश जारी केला आहे. या कालावधीत कोणतेही वाद्य वाजवण्यास किंवा जमाव करण्यास बंदी आहे. त्यामुळे नरक चतुर्दशी च्या आदल्या रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत कोणत्याही प्रकाराचे वाद्य वाजवण्यास बंदी असेल. इतर वेळी मंडळानी पारंपरिक वाद्याचा वापर करून मिरवणुका काढाव्यात, याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस निरिक्षक विजय यादव यांनी दिला आहे.