You are currently viewing ऑनलाईन व्यापार स्पर्धेत सिंधुदुर्ग व्यापारी संघही उतरणार – नितीन वाळके 

ऑनलाईन व्यापार स्पर्धेत सिंधुदुर्ग व्यापारी संघही उतरणार – नितीन वाळके 

सर्व ४२ बाजारपेठांची मिळून एक कंपनी स्थापन करणार…

कणकवली

जिल्ह्यातील बाजारपेठांतील आठवडा बाजारात होणारे अन्य जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचे आक्रमण तसेच ऑनलाईन स्पर्धा याचा प्रचंड परिणाम जिल्ह्यातील स्थानिक बाजारपेठांवर झाला आहे. या स्पर्धेला तोंड देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ४२ बाजारपेठांची मिळून एक ऑनलाईन कंपनी स्थापन केली जाणार आहे. या कंपनीच्यातर्फे सर्व व्यापाऱ्यांची उत्‍पादने ऑनलाईन माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्‍न असेल अशी माहिती जिल्‍हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके यांनी दिली.

कणकवलीतील हॉटेल एनएच ०७ च्या सभागृहात जिल्‍हा व्यापारी महासंघाची पत्रकार परिषद झाली. यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, कार्यवाह नितीन वाळके, कणकवली व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर यांच्यासह मधुकर नलावडे, राजन पारकर, महेश नार्वेकर, विलास कोरगावकर, शेखर गणपत्‍ये, नंदन वेंगुर्लेकर, अशोक करंबेळकर आदी उपस्थित होते.

श्री. वाळके म्‍हणाले, शेतकऱ्यांकडील शेतमालाला बाजारपेठ मिळावी यासाठी आठवडा बाजार संकल्‍पना अस्तित्वात आली. या आठवडा बाजारात शेतमाल येण्यापर्यंत ठिक होतं. पण आता किराणा सामान, कपडे व इतर सर्व साहित्‍य घेऊन अन्य जिल्ह्यातील विक्रेते येत आहेत. स्थानिक दुकान व्यावसायिकांपेक्षा कमी किंमतीमध्ये ते साहित्‍य उपलब्‍ध करून देत असल्‍याने व्यापाऱ्यांना त्‍याचा मोठा फटका बसत आहे. वस्तुत: अन्य जिल्ह्यातील या विक्रेत्‍यांकडून वजनमापामध्ये तफावत, कमी गुणवत्तेचा माल विक्री केला जातो. मात्र त्‍यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा सक्षमपणे काम करत नाहीत. ग्राहकांनाही या फसवणुकीची कल्‍पना येत नाही. परंतु स्थानिक व्यापाऱ्यांवर मात्र त्‍याचा मोठा परिणाम होत आहे.

श्री.वाळके म्‍हणाले, ऑनलाईन कंपन्यांनी आता ग्रामीण भागापर्यंत आपला विस्तार केला आहे. सर्व वस्तु ते घरपोच देत आहेत. त्‍याचाही मोठा फटका जिल्‍ह्‍यातील सर्व व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे. केंद्र सरकारने व्यापार क्षेत्रातील परकिय गुंतवणुकीला ४० टक्‍के परवानगी दिली, तेव्हा आम्‍ही भारत बंद पुकारला. मात्र त्‍याची पर्वा न करता शासनाने आता १०० टक्‍के गुंतवणुकीला परवानगी दिली आहे. त्‍यामुळे आता आम्‍हा सर्व व्यापाऱ्यांना स्पर्धेत उतरल्‍याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

श्री.वाळके म्‍हणाले, ऑनलाईन व्यापाराला तोंड देण्यासाठी आता जिल्ह्यातील सर्व ४२ व्यापारी पेठांची मिळून एक ऑनलाईन कंपनी स्थापन करणार आहोत. या कंपनीत सर्व व्यापारी जोडले आणि जिल्ह्यातील सर्व ग्राहक जोडले जातील. ऑनलाईन कंपन्यांप्रमाणेच ग्राहकांनाही जिल्‍हा व्यापारी संघाच्या ऑनलाईन संकेतस्थळावर सर्व वस्तू उपलब्‍ध होतील आणि घरपोच पोचविल्‍या जातील.

ते म्‍हणाले, ऑनलाईन कंपनी स्थापन करण्याबाबत सर्व व्यापारी पेठांनी सहमती दिली आहे. चार दिवसापूर्वी कुडाळ येथे व्यापार महासंघाच्या सभेत याबाबत सविस्तर चर्चा झाली. आता प्रत्‍यक्ष कार्यवाही सुरू करण्यासाठी आम्‍ही व्यापारी महासंघाचे प्रतिनिधी सर्व व्यापारी पेठांचा दौरा करत आहोत. सर्व व्यापारी पेठांच्या अडचणी समजून घेत आहोत. मात्र लवकरच ऑनलाईन कंपनी स्थापन करून आम्‍ही ऑनलाईन मार्केटींगच्या स्पर्धेत उतरणार आहोत.

ऑनलाईन फसवणुकीबाबतही जनजागृती

ऑनलाईन माध्यमातून ग्राहक विविध वस्तू मागवतात. यातील अनेक वस्तुंचे आयुष्य अत्‍यंत कमी कालावधीचे असते. उत्‍पादनांना गुणवत्ता नसते. ही बाब आम्‍ही ग्राहकांपर्यंत पोचवून जनजागृती करणार आहोत. बाजारपेठेतील व्यापाऱ्यांकडे मिरची अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या विक्रेत्‍यांच्या तुलनेत स्वस्त असते. मात्र हे विक्रेते पाणी मारून मिरची आणतात. या मिरचीचा मसाला सहा महिने देखील टिकत नाही. याबाबीही आम्‍ही ग्राहकांपर्यंत पोचवणार असल्‍याचे श्री.वाळके म्‍हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा