You are currently viewing आली आली दिपावली

आली आली दिपावली

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य…लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक, श्रीशब्द समूह सहप्रशासक लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखीत अप्रतिम ललितलेख.*

*आली आली दिपावली*

हवा ही गुलाबी, नशा ही गुलाबी
गुलाबी हवेची, ही धुंदी शराबी…
धुक्याचा पसारा, कापसासारखा
रविचा नजरा, नबाबी नबाबी…

मयूर पंख गालावर फिरावे…अंग अंग शहारून जावे… स्पर्शाने हवेच्या गुलाबाने मोहरून…बहरून यावे…काट्याने अंगावर रुतावे…असे तुझे येणे…मज गुलाबी भासावे… शराबी शराबी नशेत धुंद व्हावे…नदीने धुक्याची धवल चादर लपेटून घ्यावी…पहाटे पहाटे पाखरांनी जागे व्हावे… दवबिंदूंनी पात्यांवरुनी ओघळावे…अधर पाकळ्यांनी लाली गुलाबी प्यावी… मिठी सैल होता…स्वप्नेही विरावी…सोनसळी किरणांनी कवडसा घ्यावा…नेत्रसुख घेता क्षण नि क्षण आनंदून जावा…
दिस दिवाळीचे येता हवा धुंद होते…मिठीत पहाटेच्या धुके विरुनी जाते…थंडगार हवेचा स्पर्श अंगाला झोंबतो…चाहूल दिवाळीची मनाला देऊन जातो… ऊन कोवळे… मन होउनी बगिच्यात रमते…साज किरणांचा लेउनी…पाना फुलांत बागडते… पुंकेसरातील अमृत पिउनी… क्लेश, पीडा, दुःखाचे तृण रुजले उगाच ते काढुनी फेकते…! करू जाता साफसफाई…कानाकोपऱ्यात घराच्या…मन केर कचरा शोधते…भिंतीवरील कोळीष्टके…जळमटे झाडुनी काढते…जसे मनामधील राग, रुसवे, फुगवे…मनातून काढून मन स्वच्छ करावे…मनाने आतल्या आत आनंदून जावे अगदी तसेच…दिवाळी येता घर झाडून पुसून स्वच्छ होते… खिडक्या, द्वार, भिंती, कपाटे, भांडी-कुंडी, कपडे-लत्ते साबणाच्या पाण्यातून न्हाऊन सुलाखून येतात…अंगावरील मळ झाडून, धुवून टाकतात…सुगंधित जलाचा अभिषेक होतो…स्वच्छ मुलायम कपड्याने अंग अंग पुसून काढतात… अन्….पुन्हा एकदा आपल्याच जागेवर विराजमान होतात…पुढची दिवाळी कधी येईल, नव्याने न्हाऊ घालतील याची वाट पाहत…!
बांबूच्या काठीवर धारदार सुरी चालते…रेशमासारखा गुळगुळीत मुलामा देते…दोरीच्या सहाय्याने बांधून घेते…त्यातुनी एक नवी कलाकृती जन्म घेते… रंगबिरंगी कागदांनी लपेटली जाते…जणू दिवाळीत काठीने नवीन वस्त्रे परिधान करावीत… नव्या नवरीसारखे सजून घ्यावे तशी काठी सजते…अवकाशी उंच बांधली जाते…दिव्यांनी रोषणाई करता…आकाशकंदील नाव मिळवते… सणासुदीची खरेदी नवनवीन कपडे…काठा पदराची साडी असे पत्नीस प्रिय भारी…आईच्या आवडीची नऊवारी…बहिणीस लाडक्या हलकी फुलणारी…वडिलांच्या सदरा शेला खांदावरी…मुलाबाळांच्या आनंदाचे घालतो आम्ही कपडे अंगावरी…!
भाजणी, कांडणी सुरू होते… चकलीच्या पिठाचा खमंग वास नाकावाटे नासानसांत भिनतो…मैदाही स्वतःला पाण्यात डुबवून घेतो…तेल तुपाचे मोहन देता…लाकडी पोळपाटावर यथेच्छ लोळण घेऊन…उभा आडवा चिरला जातो…तेलात डुबकी घेताच तांबूस तपकिरी रंगांनी नटलेली खुसखुशीत शंकरपाळी…नजरेत भरते…चणाडाळ तव्यावर फडफडते… तडतडते…जात्यावर भरडून येते…तूप साखरेत मिसळून जाते…मुलायम हातांच्या स्पर्शाने गोलाकार स्वादिष्ट लाडू बनतो…कितीक दिवस तांदूळ पाण्यात डुबकी मारून पोहत राहतात…तेव्हा कुठे अनारसे बनतात…शेव, चिवडा कडीपत्त्याच्या संगतीने हळद, लवण, मसाल्यासोबत मस्त फिरून, मजा मारून घेतात…घरभर फराळाचा वास सुटतो अन् …न खाताच पोट भरल्याचा भास होतो…ग्रंथीना महापूर येतो…पाझर जिव्हावरी सुटतो…वाहत वाहत पोटाच्या महासागरात विसावतो… अन्…तृप्ततेचा ढेकर देतो…!

दारी तोरण सजले
दिस दिवाळीचे आले…
पणतीच्या उजेडात
घरदार उजळले…!

दिस दिवाळीचा येतो…उटणे अंगास लावुनी…अभ्यंगस्नान करितो…प्रतीक नरकासुराचे…तुळशी वृंदावनासमोरी… कारट फोडीतो…चव जिभेवर कडू…रोगराईचा नाश होतो… दारी झेंडूचे तोरण…आम्रपर्ण सुशोभित सजवितो…गोड, तिखट फराळाने जन तृप्त होउनी जातो… सांजवेळ ती होताची…पणतीच्या रांगा लागती…तेज दिव्यांचे चमकते…घरी दारी सभोवती…दिव्यांच्या रोषणाईने घरदार उजळून जाते…गगनी आकाशकंदील झळकत राहतात, घराचे सुख दूरवर लोकांस सांगतात…
गाय वासरांची पूजा, परंपरा पूर्वजांची…शुभ पाऊले पडती…घरामध्ये लक्ष्मीची…बलिप्रतिपदा पाडवा…मागोमाग येतो…!

सखे तुज काय देऊ….
तू गं माझी ओवाळणी…
मनमंदिरातील माझ्या…
सजणी गं तूच माझी राणी…

दिर्घायुष्य प्राप्तीसाठी मानुनी परमेश्वर पती ओवाळीते पत्नी…प्रेम वाढते नात्यात, नसे माया, आपुलकीची क्षती…
शेणसडा होतो अंगणी…वर रंगबिरंगी रांगोळी…रोषणाईने उजळती दशदिशा आभाळी…नाते घट्ट ओवण्याची, होते तयारी सुरू…नेत्री सुख माळुनिया, बहीण भावाला ओवाळी… भेट देता भाऊ हाती, सुख डोळे भरून वाहती…!

सांगितसे येते ताई
अंगणातली रांगोळी
भाऊबीजेच्या दिनी
पंचारतींनी ओवाळी

पाच दिवसांची दिवाळी, वर्षभर सौख्य गाठी…आरास लक्ष दीप… निमित्त सगेसोयरे भेटी… डोळे भरुनी पाहता प्रिये…हास्य खुलते ओठी…उत्सव हा दिव्यांचा…भाऊ-बहीण प्रेमाचा…सुख वाटून घेण्याचा…लक्ष्मीच्या पूजनाचा…सखी, राज्ञी, प्रिय पत्नी…पतीराजा ओवाळीते…सौख्य किती किती तिच्या, नेत्रात दाटते…म्हणूनची स्त्री घराची, खरी लक्ष्मीच असते…दीप लावुनी घरीदारी दशदिशा उजळते…!

©【दीपी】
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा