कुडाळ :
हिर्लोक येथील ग्रामस्थ प्रकाश बरगडे यांना वन्यप्राणी (नर) गवा हा हिर्लोक येथील श्री. शंकर अनंत शिर्के यांचे मालकी क्षेत्रात मृतावस्थेत दिसुन आला. त्यानी त्याबाबत वनविभागाला कळविले असता वनविभागाचे अधिकारी श्री. अमृत शिंदे, श्री. अमित कटके, श्री. महेश पाटील, श्री सुरेश मेतर, श्री. प्रशांत कांबळे व महेंद्र देशमुख असे वनविभागाचे पथक तात्काळ दाखल होत सदरील परिसराची पहाणी केली.
त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी कुडाळ यांचेकडुन मृत गव्याचे शवविच्छेदन करणेत आले. प्रथम दर्शनी पशुवैद्यकीय अधिकारी यांचे तपासणी वरुन सदरील रानगवा हा सुमारे १२ वर्षाचा असुन तो इलेक्ट्रीक शॉक (धक्का) लागुन मृत झाला असावा असे मत व्यक्त करणेत आले. तसेच मृत गव्याचे वरील बाजुने इलेक्ट्रीक लाईन गेल्याची दिसुन येत होती. सदर विद्युत भारीत तारेमुळे गव्याचा मृत्यू झाला असेल तर निष्काळजीपणा करणा-या संबंधितावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असलेबाबत कडावलचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमित कटके यांनी सांगितले.
वन्यप्राणी रान गवा हा अनुसुचीमध्ये समाविष्ट असुन वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये कायद्याने त्याला संरक्षण दिलेले आहे. पुढील तपास सावंतवाडी उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली चालू आहे.