You are currently viewing स्वच्छता राखा अन्यथा ते स्वच्छतागृह तात्काळ बंद करा

स्वच्छता राखा अन्यथा ते स्वच्छतागृह तात्काळ बंद करा

व्यापारी संकुलातील स्वच्छतागृहाबाबत व्यापाऱ्यांसह मनसेच्या पदाधिकाऱ्यांची मुख्याधिका-यांकडे मागणी

सावंतवाडी

येथील पालिकेच्या व्यापारी संकुलातील स्वच्छतागृहामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्याचा नाहक त्रास येथील व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी स्वच्छता राखा अन्यथा ते स्वच्छतागृह तात्काळ बंद करा, अशी मागणी व्यापाऱ्यांसह मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. दरम्यान या संदर्भात लवकरात लवकर कार्यवाही करून त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था निर्माण करू, असे आश्वासन मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी उपस्थितांना दिले. याबाबत संकुलातील काही व्यापाऱ्यांनी मनसेचे शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या नेतृत्वाखाली श्री. जावडेकर यांची भेट घेतली.
यावेळी उपशहर अध्यक्ष शुभम सावंत, सचिव कौस्तुभ नाईक, प्रवीण गवस, दर्शन सावंत, सुमेध सावंत आदींसह मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते.
यावेळी श्री.सुभेदार यांनी मनसेच्या माध्यमातून शहरातील अनेक समस्यांकडे श्री.जावडेकर यांचे लक्ष वेधले. यावेळी ते म्हणाले, शहरात आजही अनेक ठिकाणी नागरिकांकडून अस्वच्छता केली जात आहे. त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. त्यामुळे शहरातील परिसर अस्वच्छता करणाऱ्यां विरोधात पालिका प्रशासनाने कठोर पावले उचलावी, अशी मागणी त्यांनी केली. तर शहरात अनेक ठिकाणी ड्रेनेजची सुद्धा समस्या आहे. त्यामुळे अनेक भागात दुर्गंधीचे साम्राज्य आहे. त्यावर सुद्धा योग्य त्या उपाययोजना राबविण्यात याव्यात, असेही यावेळी उपस्थितांकडून सांगण्यात आले. दरम्यान येथील व्यापारी संकुल परिसरातील स्वच्छतागृहात अस्वच्छता असल्यामुळे तेथील व्यापाऱ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपला व्यवसाय करत असताना त्यांना नाक मुठीत धरून राहावे लागत आहे. भविष्यात त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे या ठिकाणी तात्काळ कार्यवाही करणे गरजेचे आहे. एकतर त्या ठिकाणी स्वच्छता राखली जावी, अन्यथा ते स्वच्छतागृह बंद करण्यात यावे, अशी मागणी यावेळी उपस्थितांकडून करण्यात आली. दरम्यान या संदर्भात आपण योग्य ती कार्यवाही करून व्यापाऱ्यांना पर्यायी स्वच्छतागृह उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन श्री. जावडेकर यांनी दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा