*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच….लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या लेखिका कवयित्री आशा भावसार लिखीत अप्रतिम ललित लेख.*
*चित्रललित लेखन*
*ओढ मनी शरदाची*
*मिलना आतुर रोहिणी*
*तारकांसवे चांदव्याची*
*जणू धरेला ही मोहिनी*
कृष्णधवल नभांगनी जणू बहरलेला पारिजात…. रिती करित ओंजळ शिंपून फुलांचा सडा…. तनामनास
गंधाळुन प्रेम वेड लावी…. जणू पुनवेचा चंद्रमा काळ्याकुट्ट काळोखात शुभ्र चमकणारा तेजस्वी आणि पाहताच मनाला मोहविणारा तो शितल चंद्रमा कलेकलेने वाढून पौर्णिमेला पूर्णत्वास येऊन… आसमंताला आपल्या मनोहारी सौंदर्याने प्रेमात पडायला भाग पाडतोच …कारण त्याचे सोज्वळ, शांत,शितल, अनुपम्य लावण्य, मनमोहक व तेजपुंज रुप हे पूर्ण सृष्टीचे सौंदर्य फुलविणार असतं…. त्यात शरदाच्या पुनवेला…तो नटून थटून एखाद्या नवरदेवा प्रमाणे रुबाबात सख्यास भेटण्यास येतो….
त्याच्या स्वागतास जणू असंख्य तारका,प्रितवेडया निशा सोबत गंधाळलेली धरा नटून खटून अप्सरा प्रमाणे त्याच्याभोवती फेर धरून नृत्य करण्यास आतुरलेल्या असतात…
कोजागिरी पुनवेला जणू त्या मिलनास आतुरलेल्या. …..मनात एक अनामिक ओढ,प्रेमाची साथ, मिलनाची आस, मनी एकच ध्यास… प्रियकर चांदव्या सवे प्रीत रंगी न्हाऊन चिंब चिंब होणं….जणू असंख्य गोपिका समवेत वृंदावनी तो प्राण सखा नटखट कुंजबिहारी कृष्ण कन्हैया त्याच्या प्रेमवेड्या गोपिका समवेत रासक्रीडा खेळतात…. त्याचप्रमाणे एक निशाकर व असंख्य तारका जणू कृष्णधवल नभांगनी त्याच्या मंद शितल,हलक्याशा मादक, प्रणय धुंदीत,प्रीतीच्या बेधुंद गारव्यात जणू यौवनाने ओतप्रोत, शुभ्र वलयाने तेजाळलेल्या, देखण्या अनुपम, लावण्याचा पुतळा प्रियकर रजनीनाथा सोबत रास क्रीडा खेळण्यात बेधुंद…… प्रेमात चिंब चिंब भिजलेल्या शीतल, मंद मंद किरणाने मनामनाला मोहविनाऱ्या चांदव्यास जणू कोजागिरीला बहरलेली सृष्टी पाहून जगत् जीवन जगदीश कृष्ण कन्हैया आपल्या प्रेमिकांची प्रेमभूक भागवण्यास कोजागिरी शरद पुनवेच्या चांदव्याला साक्षी ठेवून रास रचतात…. तेव्हा शरद पुनवेचे त्या चांदव्याचे ते रूप नक्कीच अद्भुत व अपूर्वच…
कोजागिरीच्या शांत, मदमस्त, धुंद, प्रसन्न वातावरणात तना मनाला सुखवणाऱ्या सहवासाची ओढ ही रोहिणी सवे धरेलाही तितकीच हवीहवीशी वाटते त्यासाठी ती व्याकुळतेने पुनवेची वाट पाहते…. जणू ही प्रेमाने ओतप्रोत निशा मंद मंद प्रकाशात …कोमल,नाजूक रसरशीत,अलवार गुलाबी ओष्ट पाकळ्यातून प्रेम रस प्राशन करण्यात गुंग असते…. सारी सृष्टी ही प्रेमात नाहून निघते…. शरदाच्या चांदव्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली….
*सौ.आशा सचिन भावसार जालना*