कुडाळ :
कुडाळ तालुका भाजपच्यावतीने आमचे संविधान आमचे अभिमान सविधान समर्थन रॅली शुक्रवार २१ ऑक्टोबर रोजी कुडाळ येथे काढण्यात येणार आहे. अशी माहिती ओरोस मंडलचे अध्यक्ष दादा साईल यांनी देऊन आमदार वैभव नाईक यांच्या विरोधातील जी चौकशी सुरू आहे. त्या चौकशीच्या विरोधात मोर्चा काढणे म्हणजे संविधानाचा अवमान करणे असे आहे असेही त्यांनी कुडाळ भाजप कार्यालय येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
कुडाळ भाजप कार्यालय येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ओरोस मंडलचे अध्यक्ष दादा साईल यांनी सांगितले की भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या संविधानाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. याच भारतीय संविधानाने विविध शासकीय आणि प्रशासकीय संस्थांना अधिकार प्रदान केले आहे. लाज लुचपत प्रतिबंध विभागाने याच संविधानिक अधिकारांचा वापर करून कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्याचा राग मनात ठेवून आमदार वैभव नाईक यांचे चेले हे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या कार्यालयावर वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढत आहेत. या वृत्तीचा निषेध असून हा मोर्चा म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या भारतीय संविधानाचा अपमान आहे आणि हा अपमान आम्ही कधी खपवून घेणार नाही याकरिता भारतीय जनता पार्टीच्या वतीने भारत देशाला महासत्तेकडे नेणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या भारतीय संविधानाच्या समर्थनार्थ शुक्रवार २१ ऑक्टोंबर सकाळी १० वाजता कुडाळ भाजप कार्यालय ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत आमचे संविधान आमचा अभिमान अशी संविधानाच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात येणार आहे. असे त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले यासंदर्भात कुडाळ तहसीलदार अमोल पाठक व कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हुलावले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष विनायक राणे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष दीपक नारकर, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष संध्या तेरसे, जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, जिल्हा कार्यकारणी सदस्य आनंद शिरवलकर, सचिन तेंडुलकर, तालुका सरचिटणीस विजय कांबळी, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रुपेश कानडे, सोशल मीडिया युवा मोर्चा अध्यक्ष राजवीर पाटील, नगरसेवक निलेश परब, ऍड राजीव कुडाळकर, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, महिला तालुका अध्यक्ष आरती पाटील, राजा प्रभू, सतीश माडये, चिटणीस रेवती राणे आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.