एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा…
मालवण
आपला भारत देश जागतिक महासत्ता बनवण्याचे स्वप्न मिसाईल मॅन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी पाहिले. त्यासाठी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी स्वतःच्या मंत्रिमंडळात दिलेली केंद्रीय मंत्री पदाची ऑफर त्यांनी नम्रपणे नाकारून भारत देश आण्विक सक्षम करण्याकडे अधिक लक्ष दिले आणि मे १९९८ ला पोखरण मध्ये देशातील सर्वात शक्तिशाली अणू चाचणी करून सक्षम भारताची जगाला ओळख करून दिली. आपला देश जागतिक महासत्ता बनवणे हे त्यांचे स्वप्न होते. आजचे विद्यार्थी हे उद्याचे भविष्य आहेत. त्यामुळे डॉ. कलाम यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने मेहनत घेणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन एमआयटीएम इंजिनिरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. सूर्यकांत नवले यांनी येथे केले.
मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (एमआयटीएम ) कॉलेज ओरोस येथे भारत डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिना निमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य नवले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी कॉलेजचे प्राचार्य प्रा. सूर्यकांत नवले यांनी डॉ. अब्दुल कलाम यांच्या जीवनातील प्रसंगांना उजाळा दिला.
ते म्हणाले, आपला भारत हा देश महासत्ता बनवून जगात नावलौकिक मिळवेल हे स्वप्न त्यांनी पाहिले होते. हे स्वप्न देशातील तरुण पूर्ण करतील असा विश्वास त्यांना होता. म्हणून आयुष्यभर शाळा, कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे दिवसातील जास्तीत जास्त वेळ वाचनाला देऊन वाचक कसा वाढवता येईल, त्यासाठी “वाचला तो टिकला” हे ब्रीद वाक्य लक्षात घेऊन आजपासून प्रत्येकाने वाचनावर भर द्यावा. वाचनाने मनुष्य कितीतरी पटीने ज्ञानी होऊ शकतो यासाठी विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात करावा. अभ्यासा व्यक्तीरिक्त इतर वाचन साहित्य वाचण्याचे आवाहन करून देशाच्या आणि स्वतःच्या विकासासाठी त्याचा फायदा कसा होईल, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ग्रंथालय विभागाच्या प्रमुख अपर्णा मांजरेकर यांनी डॉ. अब्दुल कलाम यांच्याबद्दल थोडक्यात मनोगत व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमास प्रशासकीय अधिकारी राकेश पाल, डीन पूनम कदम, प्रा. विशाल कुशे, प्रा. तुषार मालपेकर, प्रा. बसवराज मगदूम, प्रा. मनोज खाडिलकर, प्रा. सुकन्या सावंत, संस्थेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.