ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची मागणी
वैभववाडी
सण-उत्सवाच्या काळात दुग्धजन्य तसेच इतर भेसळयुक्त पदार्थांची विक्री करणाऱ्या वितरकांवर कारवाई करावी अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी मा. के. मंजूलक्ष्मी यांच्याकडे मेलद्वारे केली आहे. अधिक माहितीसाठी आणि योग्य कार्यवाहीसाठी सदर मेलची प्रत सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग सिंधुदुर्ग व जिल्हा पुरवठा अधिकारी यांना पाठवली आहे.
सण-उत्सवाच्या काळात दूध, दही, ताक, तूप, लोणी, पनीर, डालडा,तेल व खवा आदी पदार्थांची मागणी वाढते. त्यामध्येच अनेक जनावरांना लम्पी रोगाची लागण झाली आहे. त्यामुळे गाईच्या दुधाचा तुटवडा भासण्याची दाट शक्यता आहे. याचा नेमका फायदा घेऊन काही समाजविघातक शक्तीकडून बनावट दूधजन्य पदार्थ बाजारात विक्रीस आणण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने याकडे विशेष लक्ष देऊन भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाध्यक्ष प्रा. श्री.एस.एन.पाटील, उपाध्यक्ष श्री.एकनाथ गावडे, संघटक श्री. सिताराम उर्फ दादा कुडतरकर व सचिव श्री.संदेश तुळसणकर यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे मेलव्दारे केली आहे.