अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतली आहे. त्यामुळे ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित मानला जातोय. चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची माहिती दिली. ते पत्रकारांशी बोलत होते. मुरजी पटेल हे भाजपचे उमेदवार आता आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत, असंही बानवकुळे यांनी स्पष्ट केलं.
2019च्या निवडणुकीत मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांनी भाजपमधून बंडखोरी केली होती. 2019च्या निवडणुकीत मुरजी पटेल हे दुसऱ्या स्थानी राहिले होते. त्यानंतर आता भाजपकडून त्यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आलेली होती. शिंदे गटानेही मुरजी पटेल यांना पाठिंबा दिला होता.
मात्र आता पुन्हा मुरजी पटेल यांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आदेश पक्ष श्रेष्ठींकडून देण्यात आल्याचं बावनकुळे यांनी म्हटलंय. ते पक्ष आदेशाचा पालन करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. आपल्यावर कोणताही दबाब नसून आपण अर्ज मागे घेतला आहे, असं मुरजी पटेल यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय.